वार्ताहर /माशेल
दी माशेल अर्बन सहकारी संस्थेची निवडणूक 23 फेब्रु. रोजी माशेल येथील कदंब बसस्थानक सभागृहात होणार आहे. अॅड. विनायक शेट नार्वेकर यांनी या निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनल जाहीर केले आहे. माशेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व अकराही उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापैकी पुष्पा शशिकांत आमोणकर, विमल लक्ष्मण नाईक (महिला गटातून) व सीताराम मुकुंद गावडे (एसटी गटातून) या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती त्यांनी दिली.
विनायक नार्वेकर पॅनलमध्ये नार्वेकर यांच्यासह प्रकाश नाईक, विकास भगत, बाबी चोडणकर, पुरुषोत्तम फडते, अर्जुन नाईक, भानुदास गावकर, सतीश नाईक, रामानंद तारी व शांताराम वरगांवकर यांचा समावेश आहे. माशेल अर्बनची स्थापना 1991 साली झाली व गेली 32 वर्षे संस्थेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्रात संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. संस्थेच्या एकूण चार शाखा असून संस्था पूर्णपणे नफ्यात असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.