प्रतिनिधी / बेळगाव
कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी बेळगावला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी शहर तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या या भेटीने सीमावासियांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
सीमा समन्वयमंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई बेळगावला येणार होते. परंतु कर्नाटक सरकारच्या दबावामुळे त्यांना बेळगावमध्ये येता आले नाही. त्यामुळे मराठी भाषिकांचा काहीसा हिरमोड झाला होता. परंतु मंगळवारी सकाळी अचानक आमदार रोहित पवार यांनी बेळगावला भेट दिली.
बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येळ्ळूर गावाला भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर, शांताई वृद्धाश्रम तसेच हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकालाही त्यांनी भेट दिली. महाराष्ट्रातील सर्व नागरिक सीमावासियांच्या पाठिशी आहेत, असे त्यांनी सांगितले.
1986 च्या आंदोलनाला उजाळा
आमदार रोहित पवार यांनी राणी चन्नम्मा चौक येथे काहीकाळ थांबून 1 जून 1986 च्या आठवणींना उजाळा दिला. 1986 च्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार सहभागी झाले होते. याचाच धागा पकडत त्यांनी येथे काहीकाळ घालविला. ही जरी धावती भेट असली तरी लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.