तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील यांचे आवाहन
बेळगाव : सर्व तरुणांनी येत्या 7 मे रोजी आपल्या कुटुंबासमवेत मतदान करावे. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी सर्व साक्षर मतदानाचे महत्त्व जाणून घ्यावे आणि सर्वांनी मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील यांनी केले. तालुका स्वीप समितीच्यावतीने सोमवारी ता.पं.च्या सभागृहात युवा मतदार जागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. आजचे तरुण हे उद्याच्या भारताचे भविष्य आहे. निवडणूक कोणतीही असो तरुणांची मते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. यावेळी गणेश के. एच. म्हणाले, तरुणांची मतदार यादीत नावे समाविष्ट करून निवडणुकीत न चुकता मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका पंचायतीचे राजेंद्र मोरबद आणि इतर अधिकारी उपस्थित होते.