पुणे / वार्ताहर :
जागेची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयातील तलाठय़ांच्या दोन मतदनीसांनी संबंधिताकडे 50 हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी 5 हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली.
भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय 56, रा. वाघोली, पुणे) व संजय मारुती लगड (53, रा. लोहगाव, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 46 वर्षीय व्यक्तीने एसबीकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालय, ता. हवेली, पुणे येथे अर्ज केला. त्यानंतर तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे आरोपी संजय लगड व भाऊसाहेब गिरी यांनी तलाठयांकडून काम करुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी यांनी जागेची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठी पटांगे यांच्यासाठी भाऊसाहेब गिरी यांनी 45 हजार रुपये तर त्यांच्या स्वत:साठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पाच हजारांची लाच स्वीकारताना दोन्ही मतदनीसांना एसीबीने रंगेहाथ अटक केली. दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अ, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करत आहेत.