वृत्तसंस्था/ मेलबर्न
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली असून फिरकी गोलंदाज जॉर्जिया वेअरहॅमचा समावेश केला आहे.
मध्यंतरी पायाला झालेल्या दुखापतीमुळे वेअरहॅमला क्रिकेटपासून काही कालावधीसाठी अलिप्त राहावे लागले होते. या स्पर्धेसाठी कर्णधार मेग लेनिंगचे पुनरागमन झाले आहे. ऍलिसा हिलीकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आयसीसी टी-20 महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना 12 फेब्रुवारीला न्यूझीलंड बरोबर होणार आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांचा एकाच गटात समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची किम गॅरेथ टी-20 प्रकारात आपले या स्पर्धेत पदार्पण करणार आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघ- मेग लेनिंग (कर्णधार), ऍलिसा हिली (उपकर्णधार), डार्सी ब्राऊन, ऍश्ले गार्डनर, किम गॅरेथ, हिथेर ग्रॅहॅम, ग्रेस हॅरीस, जेस जोनासेन, ऍलेना किंग, ताहिला मॅकग्रा, बेथ मुनी, एलीस पेरी, मेगान स्कूट, ऍना बेथ, सुदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅम.