जगभरातील वैज्ञानिक अचंबित, कारणाचा घेत आहेत शोध
पूर्ण जग समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे चिंतेत पडले आहे. अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या आसपास समुद्राची पातळी पुढील 30 वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याचा अहवाल नासाने अलिकडेच प्रसिद्ध केला आहे. अशा स्थितीत जगातील एका दशात समुद्राचे पाणी ऐतिहासिक स्वरुपात कमी होत चालले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडतोय हेच वैज्ञानिकांना अद्याप समजलेले नाही.
माल्टा आणि गोजेच्या किनाऱयांवर समुद्रातील पाणी नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 50 सेंटीमीटरने पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाण्यात घट झाल्याने समुद्रकिनारा अधिक लांब आणि मोठा झाला आहे. जे खडक पूर्वी समुद्रात बुडालेले होते ते आता नजरेस पडू लागले आहेत. 50 सेंटीमीटरने समुद्राची पातळी कमी कशी झाली हा प्रश्न आता स्थानिकांना भेडसावू लागला आहे.
आतापर्यंत सरासरी 15 सेंटीमीटरने पाणीपातळी कमी होत होती. मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक प्रमाणात पाणीपातळी कमी झाली होती. तर यंदा जानेवारी-फेब्रुवारीत अशीच स्थिती दिसून येते. आहे. ऑक्टोबर 1992 आणि मार्च 1993 दरम्यान सर्वाधिक 40 सेंटीमीटरने समुद्राची पातळी कमी झाली होती. परंतु सद्यकाळात जगभरात समुद्राची पातळी वाढत असताना येथील पाणीपातळी घट होत असल्याने वैज्ञानिकही चकित झाले आहेत.
भूगर्भीय बदल कारणीभूत
माल्टा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि टेक्नोलॉजीमधील समुद्रशास्त्राचे प्राध्यापक एल्डो ड्रगो यांनी यासंबंधीचे कारण विशद केले आहे. भूगर्भात काही बदल घडून येत आहेत, याचमुळे ही असामान्य घटना दिसून येत आहे, परंतु ही चिंतेची बाब नाही, समुद्राची पातळी पूर्वप्रमाणात येईल. उन्हाळय़ात पाणीपातळीत वाढ होईल असे ड्रगो यांनी म्हटले आहे. मागील 100 वर्षांमध्ये जागतिक तापमानात सुमारे 1 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. यामुळे समुद्राची पातळी सुमारे 6 ते 8 इंचाने वाढली आहे. 2050 पर्यंत यात 12 इंचापर्यंत वाढ होऊ शकते असा नासाचा अनुमान आहे.