रशियाकडून तोफांचा मारा ः 400 ठिकाणांना केले लक्ष्य
युक्रेनमधील 400 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करत रशियाने तोफांचा मारा केला आहे. युक्रेनचा तोफखाना आणि दोन इंधनडेपोंना लक्ष्य करण्यात आले. तसेच रशियन विमानांनी अन्य 39 लक्ष्यांचा भेद केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेनकोव्ह यांनी केला आहे. अमेरिकेने युक्रेनला पुरविलेले आर्टिलरी रडार, चार एअर डिफेन्स रडार आणि दारूगोळय़ाचे भांडार नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाच्या सैन्याने स्वतःच्या हवाई हल्ल्याद्वारे लवीव शहराला लक्ष्य केले. हल्ल्यांमुळे वीजवहनाच्या तीन केंद्रांचे नुकसान झाले आहे. वीज नसल्याने पंप स्टेशनचे काम ठप्प झाल्याने शहरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला असल्याची माहिती महापौर एंड्री सदोवी यांनी दिली आहे.
रशियाच्या सैनिकांनी पूर्व युक्रेनच्या अवदिवका शहरात एका रासायनिक प्रकल्पावर गोळीबावर केल्याने किमान 10 जण मृत्युमुखी पडले असून 15 जण जखमी झाले आहेत. प्रकल्पातील काम संपवून स्वतःच्या घरी जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या कामगारांना लक्ष्य करत रशियाच्या सैनिकांनी गोळीबार केला होता.
रशियाच्या राजदूताला पाचारण
रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याकडून ज्यूंच्या भावना दुखावणारे विधान करण्यात आल्यावर लातवियाच्या विदेश मंत्र्यांनी रशियाच्या राजदूताला पाचारण केले आहे. राजदूताला 5 मे रोजी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युद्ध रोखण्यासंबंधी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे पुतीन यांनी यावेळी म्हटले आहे.