ट्रक हे वाहन आपल्या नित्य परिचयाचे आहे. मार्गांवर आपण चालत असताना किंवा वाहन चालवत असताना सर्वाधिक सावधानता कोणत्या वाहनासंबंधी बाळगली जात असेल तर ती ट्रकसंबंधी. तिच्या जवळपासही आपले वाहन किंवा आपण स्वत: जाऊ नये, म्हणून सर्वजण निश्चितच दक्षता बाळगतात.
ट्रकचे अनेक प्रकार आणि आकार असतात. सर्वात मोठ्या आकाराची ट्रक कोणती आणि कुठे असेल असा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे. तर अशी अजस्त्र ट्रक बेलारुस या देशात आहे. ती बेलाझ 75710 म्हणून ओळखली जाते. ती जगातील सर्वात मोठी ट्रक मानली जाते. ज्यावेळी बेलारुस हा देश रशियाच्या अधिपत्यात होता तेव्हा बेलाझ नामक कंपनीने ही ट्रक बनविली होती. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या कंपनीने पाश्चिमात्य देशांपेक्षाही चांगल्या आणि मोठ्या ट्रक्स बनविण्याच्या व्यवसायात चांगलीच गती प्राप्त केली होती.
या ट्रकचे वजन तब्बल 360 टन आहे. तिची लांबी जवळपास 67 फूट, तर रुंदी साधारणत: 32 फूट आहे. ती एकावेळेला 450 टन वजनाचा माल वाहून नेऊ शकते. 2014 मध्ये या ट्रकने 503 टन, अर्थात 5 लाख किलोहून अधिक माल वाहून गिनिज विक्रम पुस्तिकेत स्वत:चे नाव नोंद केले होते. एवढे वजन घेऊन ती 45 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते.