ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये (Gambia) भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप (Cough Syrup) प्यायल्याने ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मेडन फार्मास्युटिकल्सच्या (Medan Pharmaceuticals) चार कफ आणि कोल्ड सिरपबाबत इशारा दिला आहे. याबाबत इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या ४ कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. सध्या डब्लूएचओकडून कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीवेळी सर्व नमुन्यात प्रमाणापेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकॉल आणि एलिथीन ग्लायकॉल आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका मेडिकल प्रोडक्ट रिपोर्टमध्ये ही बाब नमूद केली आहे. WHOने दिलेल्या इशाऱ्यात असंही म्हटलं की, वादग्रस्त उत्पादन आतापर्यंत गाम्बियामध्ये आढळले होते, मात्र हे इतर देशातही वितरीत केले जाऊ शकत होते.
हे ही वाचा : राष्ट्रपतींवर केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते उदित राज अडचणीत
मिळालेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हरियाणातील एका कंपनीत तयार केले जात आहे. या सिरपच्या सेवनाने गॅम्बियामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप अशी या चार सिरपची नावं आहेत. हे सर्व सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केले आहेत.
औषध कंपनीने WHO ला औषधांच्या सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही माहिती दिलीलेली नाही. तपासात असं समोर आलं की, या सिरपमध्ये मर्यादेपेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचा वापर केला गेला आहे. औषधांमध्ये ज्या पदार्थांचा वापर केला गेला ती विषारी आणि धोकादायक ठरू शकतात. या औषधांच्या सेवनामुळे पोटात दुखणे, उलटी, मूत्रपिंडाचा आजार, डोकेदुखी इत्यादी त्रास होऊ शकता. यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.