4.95 टक्क्यांपर्यंत घसरण ः अन्नधान्याचे दर स्वस्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डिसेंबर 2022 मध्ये घाऊक महागाई (डब्ल्यूपीआय) दरात मोठी घट झाली. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यातील घाऊक किंमत-आधारित महागाई दर 4.95 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये तो 5.85 टक्के होता. डिसेंबरमधील 4.95 टक्के हा दर गेल्या 22 महिन्यांतील नीचांक आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये महागाई दर 4.83 टक्के इतका कमी होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये हा दर 14.27 टक्के होता.
अन्नधान्य चलनवाढीत घट झाल्यामुळे घाऊक महागाई निर्देशांकात घट झालेली दिसून येत आहे. अन्नधान्य महागाई 0.65 टक्के या 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये हा दर 2.17 टक्के होता. अन्नधान्याबरोबरच भाजीपाल्याच्या दरातही फरक पडलेला दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांची महागाई -20.1 टक्क्यांवरून -35.95 टक्क्यांवर आली आहे. कांद्याचा दर -19.2 वरून -25.97 टक्के झाला आहे. तर अंडी, मांस आणि मासे यांची चलनवाढ 2.27 टक्क्यांवरून 3.34 टक्के झाली आहे. दुसरीकडे इंधन आणि ऊर्जासंबंधी उत्पादनेही महागली आहेत. इंधन-ऊर्जा साधनांचा महागाई दर 17.35 टक्क्यांवरून 18.09 टक्केपर्यंत वाढला. मात्र, खाद्यतेलाचा महागाई दरही -5.10 टक्क्यांवरून -6.05 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
‘डब्ल्यूपीआय’मध्ये दीर्घकाळ होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. याचा सर्वाधिक परिणाम उत्पादक क्षेत्रावर होतो. जर घाऊक किंमत जास्त काळ राहिली तर उत्पादक ती ग्राहकांना देतात. सरकार केवळ कराद्वारेच घाऊक महागाई दर नियंत्रित करू शकते. आर्थिक पातळीवर असंतुलित परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार काही धोरणात्मक निर्णय घेत दरात फेरबदल करते. यापूर्वी कच्च्या तेलात मोठी वाढ झाल्यास सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानिमित्ताने चढय़ा दरांवर नियंत्रण मिळविणे हा सरकारचा उद्देश असतो.