दुसऱया वकिलाने अंगावर सहा गोळय़ा झाडल्या
पेशावर / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील पेशावर उच्च न्यायालयात देशातील एका प्रसिद्ध वकिलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल लतीफ आफ्रिदी (वय 79) यांचा सोमवारी न्यायालयाच्या बार रुममध्ये दुसऱया वकिलाने गोळय़ा झाडल्याने मृत्यू झाला. आफ्रिदी सोमवारी पेशावर उच्च न्यायालयाच्या बार रुममध्ये बसलेले असताना अदनान नामक एका प्रशिक्षणार्थी वकिलाने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांना तातडीने शहरातील लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आफ्रिदी यांच्यावर सहा गोळय़ा झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अदनानला अटक केली आहे. कडेकोट बंदोबस्तात त्याला येथील दहशतवाद विरोधी न्यायालयात नेण्यात आले. वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अदनानने पेशावर उच्च न्यायालयाच्या आवारात पिस्तूल कसे आणले याचाही पोलीस तपास करत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आफ्रिदी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पेशावर बार असोसिएशनचे अध्यक्ष अली जमान यांनी आफ्रिदी यांच्या हत्येच्या निषेधार्थ खैबर पख्तूनख्वा प्रांतातील न्यायालयांमध्ये दोन दिवस कामकाज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
अब्दुल लतीफ आफ्रिदी हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. पाकिस्तानातील वकिलांच्या आंदोलनात ते आघाडीवर होते. या आंदोलनामुळे माजी सरन्यायाधीश इफ्तिखार मोहम्मद चौधरी यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. 1979 मध्ये, आफ्रिदी यांना पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल मुहम्मद झिया-उल-हक यांनी मार्शल लॉच्या विरोधात राजकीय कार्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगात टाकले होते.