न्यायालयाने गुन्हा अन्वेषणला खडसावले : वासनाकांड तक्रार प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
संकल्प आमोणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) माजी आमदार-माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात एफआयआर गुन्हा का नोंदवला नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने करून गुन्हा अन्वेषण विभागाला धारेवर धरले आणि चांगलेच खडसावून जाब विचारला आहे. तसेच आमोणकर यांच्या तक्रारीचे काय करणार ते सांगा? असे बजावून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश गुन्हा अन्वेषणला दिले आहेत. त्या तक्रारीचा अंतिम अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याची ग्वाही गुन्हा अन्वेषणने खंडपीठासमोर दिल्यानंतर पुढील सुनावणी 13 मार्च रोजी निश्चित केली आहे.
विधानसभा निवडणूक 2022 होण्यापूर्वी तत्कालीन मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात आमोणकर यांनी वासनाकांडाचे आरोप करून गुन्हा अन्वेषणकडे तक्रार नोंदवली होती. परंतु गुन्हा नोंदवण्यात आला नाही म्हणून आमोणकर यांनी शेवटी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि गुन्हा नोंद करावा म्हणून याचिका सादर केली होती. त्यावेळी आमोणकर हे आमदार नव्हते तर ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि निवडणूक झाल्यानंतर ते विजयी होऊन आमदार बनले. परंतु नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात त्याग केला आणि ते भाजपवासी झाले होते.
न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिली होती समज
भाजपात गेल्यानंतर त्यांनी न्यायालयात सादर केलेली याचिका मागे घेण्यासाठी अर्ज केला होता आणि ती मागे घेण्याची मागणी केली होती. त्यांचा अर्ज व मागणी न्यायालयाने फेटाळून लावताना आमोणकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती आणि त्यांना तसे करता येणार नाही म्हणून कडक शब्दात न्यायालयाने समज दिली होती.
आमोणकर यांची याचिका काल सोमवारी सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने गुन्हा अन्वेषणची चांगली हजेरी घेतली. नाईक यांच्या विरोधातील आमोणकरांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाला फटकारले. आता त्यांच्या तक्रारीचा काय तो निकाल लावा आणि अहवाल सादर करा, असा आदेश न्यायालयाने क्राईम ब्रँचला दिला आहे.