चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांचा निर्धार :, कथित लैंगिंक कांडाचे वृत तथ्यहीन असल्याचा केला दावा
वास्को : सामाजिक माध्यमांव्दारे मागच्या दोन दिवसांपासून पसरविले गेलेले लैगिंक कांडाचे वृत पूर्णपणे खोटे असून त्यात काहीही तथ्य नाही. केवळ राजकीय हेतूने प्रेरित हा प्रकार असून या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे, याची चौकशी व्हायलाच हवी. मला न्याय मिळायलाच हवा. हा प्रश्न केवळ आपलाच नसून समस्त माहिलावर्गाचा आहे. सत्य उघडकीस येऊन कारवाई न झाल्यास असे प्रकार इतर महिलांच्याबाबतीतही घडू शकतात, असे स्पष्ट करून चिखली पंचायतीच्या उपसरपंच ऐsश्वर्या कोरगावकर यांनी या बदनामीविरूध्द आपण लढत राहणार असल्याचा निर्धार जाहीर केला आहे. दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या मुरगाव मतदारसंघातील वासनाकांडानंतर आता दाबोळी मतदारसंघही अशाच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मागच्या प्रकरणाची परिणीती प्रथम माजीमंत्री मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्यात आणि पुढे ते निवडणूक हरण्यात झाली होती. आता या प्रकरणाच्या खऱ्या खोट्याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. गेले तीन दिवस गोव्यात गाजत असलेल्या या कथित नव्या लैगिंक कांडाचा वाद काल रविवारी अधिकृतरित्या चहाट्यावर आला. केवळ सामाजिक माध्यमांवर हे प्रकरण दोन दिवस चर्चेत राहिल्यानंतर रविवारी अधिकृत माध्यमावरही या प्रकरणाची ठळकपणे वाच्चता झाली.
बदनामीविरुद्ध लढणार : ऐश्वर्या
काल रविवारी चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांनी आपली बदनामी होत असल्याची तक्रार मांडली. सामाजिक माध्यमांव्दारे आपली बदनामी करण्यात आल्याची तक्रार त्यांनी वास्को पोलीस स्थानक तसेच सायबर क्राईम विभागाकडेही केली आहे. त्यानंतर संध्याकाळी उपसरपंच कोरगावकर दाबोळीतील महिला कार्यकर्त्यांसमवेत माध्यमांना सामोऱ्या गेल्या. यावेळी त्यांनी जो काही प्रकार घडवला गेलेला आहे तो अत्यंत हिन पातळीवरचा असून केवळ राजकीय हेतूने हा प्रकार प्रेरित असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य अॅड. अनिता थोरात, महिला शक्ती अभियानच्या अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य नॅली रॉड्रिक्स उपस्थित होत्या. चिखलीचे पंच तसेच दाबोळीतील काही महिला कोरगावकर यांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी उपस्थित होत्या.
बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा
फेसबुकवरचे आपले फोटो वापरून जराही विचार न करता सामाज माध्यमांवर आपली बदनामी करण्यात आली. आपण महिलांसाठी काम करते. आपले बॉससुध्दा महिलांसाठी तळमळीने कार्य करतात. त्याचे फळ आम्हाला अशा पध्दतीने देण्यात आले आहे. जे कुणी या बदनामीत गुंतले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आपण यासंबंधी वास्को पोलीस स्थानक तसेच सायबर पोलीस विभागालाही तक्रार दिलेली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आपल्याला न्याय द्यावा. आपण न्याय मिळवण्यासाठी लढत राहणार, असे कोरगावकर म्हणाल्या.
काँग्रेसचे गिरीश चोडणकर बेजबाबदार
आपण राजकीय नेत्याची कर्मचारी आहे, आपण त्यांना सहकार्य करत आहे, हे लक्ष्य ठेवूनच हे बदनामीचे कारस्थान रचले गेलेले असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरीश चोडणकर यांच्यावरही बेजबाबदारपणाचे आरोप केले. जिल्हा पंचायत सदस्य अॅङ अनिता थोरात यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करताना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज व्यक्त केली. नाहक बदनामी करू नका. पुराव्यांसह बोला, सिध्द करा असे आव्हानही त्यांनी दिले. महिलांच्या बदनामीचे प्रकार असेच चालू राहिल्यास सबंध गोव्यातील महिलाशक्ती एकत्र येईल असेही त्यांनी बजावले. गोवा महिला शक्ती अभियाच्या अध्यक्ष प्रा. नॅली रॉड्रिक यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करताना दाबोळी मतदारसंघातील राजकीय विरोधकांचेच हे कारस्थान असल्याचा आरोप केला. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना अशा प्रकारे बदनामीत अडकवणे हा गंभीर प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या.
मंत्री गुदिन्होंच्या कार्यालयाकडून तक्रार
पंचायतीराजमंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयाने मंत्र्यांच्या बदनामी प्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राजकारणातील सहकारी महिलेसोबतचे फोटो व व्हिडियो व्हायरल करून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी बदनामीकारक वृत प्रसारित केल्यानंतर समाज माध्यमाव्दारे बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसारित करण्यात आलेला आहे. याची गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करण्यात, यावी अशी मागणी या पोलीस तक्रारीत करण्यात आली आहे. चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांनी पोलीस तक्रार करण्याबरोबरच काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांना खुले पत्र लिहिले असून त्यात त्यांनी चोडणकर यांच्या खरमरीत टीका करून त्यांना जाब विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सेक्स स्कँडलची चौकशी करावीच : चोडणकर
पंतप्रधान, गोव्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस खात्याने ‘सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेला हा ज्येष्ठ मंत्री कोण आहे’ याची चौकशी करून सांगावे, असा मूळ प्रŽ आपण उपस्थित केला होता. त्याच मागणीचा पुनऊच्चार आजही करतो आणि या संदर्भात स्वतंत्र चौकशीची मागणी करतो. आपण सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याचे किंवा पीडित महिलेचे नाव घेतलेले नाही, असे गिरीश चोडणकर यांनी काल रविवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चोडणकर यांनी पुढे म्हटले आहे की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आपण कधीही कुणाचेही नाव घेतलेले नाही. आपणास माहीतच नाही अशा महिलेला टॅग करून कुणीतरी पोस्ट फॉरवर्ड केल्या आहेत, ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. महिलांचे लैंगिक शोषण असो किंवा अशा पोस्ट्सद्वारे बदनामी करून छळ केला जातो, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ज्यांनी तिचे फोटो वापरून महिलेची प्रतिष्ठा आणि आदर कमी केला आहे त्यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी करतो. मंत्री असलेल्या व्यक्तीने आपल्या अधिकाराचा आणि पदाचा फायदा घेऊन स्त्रीचा वापर करून तिचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करू नये. माझ्या पोस्टचे उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे हे होते की, ज्येष्ठ राजकारणी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या फायद्यासाठी महिलांचा गैरवापर करतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांना पोलिस खात्यामार्फत वस्तुस्थिती नक्कीच कळेल. आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जाणून घेण्याची कळकळीची विनंती करतो असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.