वृत्तसंस्था /कराची
येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विल्यम्सनच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पाकवर पहिल्या डावात 174 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. दिवसअखेर पाकने दुसऱया डावात 2 बाद 77 धावा जमवल्या. ही कसोटी अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे.
या पहिल्या कसोटीत खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल ठरत असल्याने दोन्ही संघांकडून चार दिवसांच्या खेळामध्ये जवळपास 1100 धावा कुटल्या गेल्या. पाकने पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर न्यूझीलंडने 6 बाद 440 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी आपला पहिला डाव 194.5 षटकात 9 बाद 612 धावावर घोषित केला.
विल्यम्सनने या सामन्यात दमदार नाबाद द्विशतक झळकविले. विल्यम्सनने सोधीसमवेत सातव्या गडय़ासाठी 159 धावांची भागीदारी केली. सोधीने 180 चेंडूत 11 चौकारासह 65 धावा जमवल्या. सोधी बाद झाल्यानंतर पाकने न्यूझीलंडचे तळाचे दोन फलंदाज खाते उघडण्यापूर्वीच बाद केले. विल्यम्सनने 395 चेंडूत 1 षटकार आणि 21 चौकारासह नाबाद 200 धावा झळकवल्या. द्विशतक पूर्ण झाल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावाची घोषणा केली. पाकतर्फे अब्रार अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 205 धावात 5 तर नौमन अलीने 185 धावात 3, मोहमद वासीम 105 धावात 1 गडी बाद केला.
174 धावांनी पिछाडीवर असलेल्या पाकने आपल्या दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. शफीक आणि इमाम उल हक या सलामीच्या जोडीने 47 धावांची भागीदारी केली. बेसवेलने शफीकला झेलबाद केले. त्याने 2 चौकारासह 17 धावा जमवल्या. सोधीने शान मसूदला 10 धावावर पायचित करून पाक संघावर दडपण आणले. इमाम उल हक 5 चौकारासह 45 तर नौमन अली 4 धावावर खेळत आहेत. पाकचा संघ 97 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. न्यूझीलंडच्या फिरकी आणि स्वींग गोलंदाजीसमोर पाकची शेवटच्या दिवशी फलंदाजीत सत्त्वपरीक्षा ठरेल.
संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 130.5 षटकात सर्वबाद 438, न्यूझीलंड प. डाव 194.5 षटकात 9 बाद 612 डाव घोषित (विल्यम्सन नाबाद 200, लॅथम 113, कॉनवे 92, मिचेल 42, निकोल्स 22, सोधी 65, ब्लंडेल 47, ब्रेसवेल 5, अब्रार अहमद 5-205, नौमन अली 3-185, मोहमद वासीम 1-105), पाक दु. डाव 31 षटकात 2 बाद 77 (शफीक 17, शान मसूद 10, इमाम उल हक खेळत आहे 45, नौमन अली खेळत आहे 4, बेसवेल 1-23, सोधी 1-17).