मी साहेबांच्या बरोबरच असून अजितदादांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवारांसोबतच असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ट्विटरवर मी शरद पवार साहेबांबरोबर असल्याची पोस्ट केल्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आजच्या घडामोडीनंतर आपली भुमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी शरद पवारसाहेबांच्या बरोबरच आहे. भाजपने ज्या प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण चालु केले आहे ते थांबले पाहीजे. शरद पवारांवर जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा ते मोठ्या ताकदीने उभा राहतात. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहीजे यासाठी शरद पवारांचे योगदान आहे. त्यामुळे पक्ष कुठेही गेला नाही तो शरद पवार साहेबांबरोबरच आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गेलेल्या आमदारांना अनेक आश्वासन देण्यात आली आहेत. त्यांच्या सह्या का घेतल्या हे काही आमदारांनाही माहीत नाही. किती जण अजित पवारांबरोबर गेलेत हे अजून माहीत नाही. यातील 9 जणांची शपथ ही पक्षाविरोधात आहे. यापुर्वी पक्षातील सात आठ लोकं ही भुमिका मांडायचे पण पक्ष नेर्तृत्वाने ही धुडकावली होती. त्यामुळे त्यांची ही भुमिका पक्षविरोधातील ठरली आहे. तसेच मुख्यमंत्र्याची आता अडचण वाढणार आहे. भाजप सांगतील तीच भुमिका आता शिंदेंना घ्यावी लागणार आहे.” असाही टोला त्यांनी हाणला.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “दिवसभरात अनेक आमदारांचे फोन येत आहेत. ते शरद पवार साहेबांबरोबरच असल्याचे कळवतायत. पाच तारखेला ऱाष्ट्रवादीची वाय. बी. चव्हाण कार्यालयात पक्षाची महत्वाची बैठक आहे. उद्या शरद पवार कराडला निघणार असून तेथे ते य़शवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.” अशी माहीती त्यांनी दिली.