शहरातील पेठमाप परिसरातील घटना , खूनाचा गुन्हा दाखल, अज्ञाताचा शोध सुरु
चिपळूण
शहरातील पेठमाप परिसरात महिलेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञाताविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु केला आहे.
कुलसुम अन्सारी (45, पेठमाप) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होत्या. सोमवारी मुलगी रत्नागिरी येथे क्रिकेट स्पर्धेला गेला होता. त्याने आईशी मोबाईलवरुन संपर्क केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. यामुळे त्याने मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. मित्र घरी पोहचल्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्याच्या मित्रांनी शेजाऱयांना बोलावून घेतले. यावेळी त्यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आले. उपस्थित नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली होती. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेहाचे कामथे रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. मंगळवारी सकाळी या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुलसुम यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांचा खून झाल्याचे पुढे आले आहे. सायंकाळी रत्नागिरीहून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी पेठमाप येथे घटनास्थळाची पाहणी केली.