गुजरातमधील मेहसाणा जिल्हय़ात तीस वर्षांपूर्वी पाच महिलांनी एक प्रिंटींग प्रेस सुरू केले आहे. त्यावेळी महिलांनी प्रिंटिंग प्रेस स्थापन करणे ही त्या गावी नवी बाब होती. आज हा प्रिंटिंग प्रेस 3 हजार 700 जणांना रोजगार देत असून 6 कोटीहून अधिक उलाढाल करत आहेत. या प्रेसचे वैशिष्टय़ असे, की उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत सर्व कामे केवळ महिला करतात. एकही पुरुष कर्मचारी किंवा अधिकारी या छापखान्यात नाही. अशा तऱहेने केवळ महिलांनी चालविलेला हा देशातील एकमेव छापखाना असल्याचे बोलले जाते.
या प्रेसच्या संस्थापिका शकुंतला या आहेत. त्यांच्या वडिलांचा छपाई व्यवसाय होता. त्यामुळे लहानपणापासून त्या छपाईच्या वातावरणातच वाढल्या. छापखाना व्यवसायातील बारकावे बालपणीच त्यांनी आत्मसात केले होते. पुढे शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी याच व्यवसायात करियर घडविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे केवळ स्वतःसाठी पैसा मिळविण्याचा हेतू नव्हता. तर आपल्यासारख्या शेकडो महिलांना रोजगार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हा सामाजिक हेतूही त्यांच्या मनात होता. आज तीस वर्षांनंतर भारतातील हा एकमेव महिलांचा प्रिटींग प्रेस विदेशातही प्रसिद्ध असून अनेक कुटुंबांचा तारणहार बनला आहे. लग्न झाल्यानंतर त्यांनी सासरीही हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांना याकामी सासरच्यांचे प्रोत्साहनही मिळाले. काळ बदलला तसे तंत्रज्ञान बदलले. या बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकारही केला. त्यांच्या या छापखान्याला आज सरकारही कामही मोठय़ा प्रमाणावर मिळते. कामाची गुणवत्ता, समयबद्धता आणि अचूकता यांच्यामुळे त्यांनी चांगलेच नाव कमावले असून अनेक महिलांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. व्यवसाय आणि समाजकार्य हे दोन्ही हातात हात घालून चालले पाहिजेत, असे शकुंतला बेन यांचे तत्वज्ञान असल्याचे त्या म्हणतात.