सदाशिवनगर स्मशानभूमीतील शवदाहिनी लवकरच सुरू होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे परिवर्तन गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये करण्यात येत आहे. सदर काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. मात्र दोन दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आले असून आठवडाभरात शवदाहिनीच्या परिवर्तनाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने डिझेलवर चालणारी शवदाहिनी सदाशिवनगर स्मशानभूमीत बसविली होती. याकरिता 65 लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता. पण सदर शवदाहिनीद्वारा अंत्यविधी केल्यास 60 लिटरहून अधिक डिझेल आणि एका अंत्यविधीसाठी 4 तासांचा अवधी लागत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे डिझेलवर चालणारी शवदाहिनी पूर्णपणे निकामी बनली आहे. अंत्यविधीसाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च येत असल्याने याचा वापर टाळण्यात आला होता. अंत्यविधी करताना मृतदेह व्यवस्थित जळत नसल्याने ही यंत्रणा कुचकामी बनली होती. त्यामुळे काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्याची मागणी केली होती.
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शवदाहिनीच्या परिवर्तनाचे काम हाती घेण्यात आले आहे. 6 महिन्यांपूर्वी आमदार अनिल बेनके यांनी महापालिकेच्या अधिकाऱयांसह शवदाहिनीची पाहणी करून काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली होती. तरीदेखील हे काम हाती घेण्यात आले नव्हते. डिझेल शवदाहिनीचे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्यासाठी मेघा गॅस कंपनी पुढे आली आहे. मध्यंतरी शवदाहिनीची पाहणी मेघा गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी केली होती. मात्र हे काम सुरू करण्यात आले नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून शवदाहिनीच्या परिवर्तनाचे काम सुरू करण्यात आले असून शनिवारपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. शवदाहिनीसाठी आवश्यक कामे करण्यात येत असून बर्नर बदलण्याचे काम शिल्लक आहे. त्यामुळे सर्व कामे शनिवारपर्यंत पूर्ण करून गॅसवर चालणाऱया शवदाहिनीची चाचणी घेतली जाणार असल्याचे मेघा गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.