वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स (अमेरिका)
कॅलिफोर्नियातील लॉस एंजिल्स येथे गुरुवारी 2026 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सदर स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाने भरवली जाणार आहे.
फिफाच्या इतिहासामध्ये 2026 ची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदाच तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे. सदर स्पर्धा 2026 च्या उन्हाळी मौसमामध्ये घेतली जाईल. ही स्पर्धा 26 वी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. या स्पर्धेच्या लोगोचे अधिकृत अनावरण फिफाचे अध्यक्ष इन्फेटिनो यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धा जून-जुलै 2026 मध्ये होणार आहे. 2022 ची फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये भरविण्यात आली होती. आणि अर्जेटिनाने ती जिंकली होती. 2026 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकामधील 16 विविध शहरांमध्ये 104 सामने खेळविले जाणार आहेत.