वार्ताहर /मच्छे
येथील नगरपंचायतीसमोरील रिकाम्या जागेत क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा रात्रीच्यावेळी पुतळा उभारण्यात आला आहे. आता हा पुतळा प्लास्टिक कागदाने झाकला असून चारी बाजूने जागतिक पर्यावरण दिनाचे फलक लावून कोणाच्याही नजरेस न येण्याची दखल पंचायतीने घेतली आहे. पुतळा उभारणीच्या बाबतीत सरकारी जागेत व कोणतीही पूर्वकल्पना न देता सोमवार रात्री गुपचूप उभारण्यात आला होता. पुतळ्याला विरोध नाही, मात्र महान व्यक्तींचे पुतळे रातोरात बसवण्यामागे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या या पुतळ्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे त्या पुतळ्याच्या चोहोबाजूने फलक लावण्यात आले आहेत.ग्रामपंचायतीसमोर व जिजामाता चौकात वडगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.