ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शी जिनपिंग (Xi Jinping) सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. आज (दि.10) जिनपिंग यांनी अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
नॅशनल पीपल्स काँग्रेसने 5 मार्चला आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक आठवडाभर चालली. या बैठकीत जिनपिंग यांना अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. झिरो-कोविड धोरणाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, या सर्व आव्हानांवर त्यांनी मात केल्याने पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित करण्यात आले. जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सोमवारी संध्याकाळीच ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. जिनपिंग यापूर्वी दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिले. आता जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. जिनपिंग यांची चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे.