गद्दीकोरविनकोप्प येथील घटना : बलूनमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य
प्रतिनिधी / बेळगाव
गद्दीकोरविनकोप्प (ता. बैलहोंगल) येथील शेतवडीत गुऊवारी एक बलून आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून शेतात कोसळलेल्या बलूनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तु आढळल्या आहेत. सुरुवातीला या बलूनविषयी नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. गुरुवारी गद्दीकोरविनकोप्प येथील एका शेतकऱ्याने शेतात बलून कोसळल्याचे पाहिले. त्यानंतर तातडीने बैलहोंगल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संशयास्पद बलून फोडला असता त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तु आढळून आल्या.
त्या बलूनमध्ये बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वस्तु आढळल्या असून पुढील तपासासाठी तो बलून बेळगावला आणण्यात आला. बलून आढळल्याची माहिती परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अलीकडेच चीनचे हेरगिरी करणारे बलून अमेरिकेत आढळले होते. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी यासंबंधी खुलासा केला आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हवामान खात्यासंबंधी अभ्यासासाठी उडविण्यात आलेला हा बलून आहे. उंचावरील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आदींविषयी अभ्यास करण्यासाठी असे बलून सोडले जातात. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले आहे.