आपण या आसानांवरील लेखमालेमध्ये पाठदुखी, कंबरदुखी व पोटदुखी आजारांवरील आसनांचा बारकाईने अभ्यास केला आहे. आजपासून आपण लठ्ठपणा किंवा वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी जी अत्यंत प्रभावी व परिणामकारक अशा आसनांचा अभ्यास करुया.
वजन कमी करण्यासाठी फक्त आसनेच नाही तर योग्य आहार, व्यायाम व तणावमुक्त दिनचर्या यांची पण अत्यंत आवश्यकता आहे. जे आपले वजन कमी करण्यासाठी जागरुक आहेत त्यांनी या सर्व गोष्टींवर आवर्जुन भर दिला तर कोणत्याही त्रासाशिवाय आपण महिन्याला 3 ते 10 किलोपर्यंत सुद्धा वजन कमी करु शकतो.
वजन कमी करणारी काही आसने आहेत त्यांचा आपण आधी अभ्यास केला आहे यामध्ये.
1) भूजंगासन
2) शलभासन
3) मर्कटासन
4) उत्तानपादासन
ही आसने पण वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ही आसने करताना जर आसनाची सवय झाल्यावर गतीपूर्वक केली किंवा या आसनांच्या अंतिम स्थितीत कपालभाती प्राणायामाचा अभ्यास केल्यास तीव्र गतीने वजन कमी व्हायला मदत होते.
या व्यतिरिक्त आज आपण आणखी दोन आसनांचा अभ्यास करणार आहोत.
1) पादवृत्तासन – 2 प्रकार
2) द्विचक्रिकासन – 2 प्रकार
1) पादवृत्तासन ः नावाप्रमाणे या आसनात आपल्याला पाय गोलाकार फिरवावे लागतात. या आसनामुळे जांघा, कंबर व पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होते.
पहिला प्रकार – या आसनासाठी सर्वात प्रथम पाठीवर पाय सरळ ठेवून उताणे झोपावे. दोन्ही हात कंबरेच्या बाजूला ठेवावे. यानंतर सावकाश श्वास आत घेऊन प्रथम उजवा पाय 45 अंश कोनात वर उचलावा व नंतर तो संपूर्ण गोलाकार फिरवावा. अशाप्रकारे घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे गोलाकार उलट व सुलट दोन्ही बाजूने किमान 5 वेळा फिरवावा व हिच कृती नंतर डाव्या पायाने पण करुन आसन पूर्णत्वाला न्यावे.
दुसरा प्रकार – या प्रकारात प्रथम पाठीवर उताणे झोपून दोन्ही पाय सरळ सोडून एकमेकांना टेकवून ठेवावेत. त्यानंतर दोन्ही पाय एकत्र 45 अंश कोनात वर उचलावे व घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे गोलाकार उलट व सुलट दोन्ही बाजूने किमान पाचवेळा फिरवावे व आसन पूर्ण करावे.
महत्त्वाचे : अ) पाय फिरवताना पोटावर, मांडय़ांवर व कंबरेवर ताण पडतो यावर लक्ष एकाग्र करावे.
ब) हे आसन सुरुवातीला सवय होईपर्यंत सावकाश करावे व नंतर तीव्र गतीने केल्यास वजन कमी होण्यासाठी लक्षणीय मदत होते.
क) थकवा येईपर्यंत आळीपाळीने हे आसन आपल्या क्षमतेनुसार तीव्र गतीने केल्यास आत्यंतीक लाभ होतो.
2) द्विचक्रिकासन : नावाप्रमाणे या आसनात चाक चालवल्याप्रमाणे पायाची हालचाल करावी लागते.
कृती : प्रथम पाठीवर उताणे झोपून दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवावे व दोन्ही हात कंबरेच्या बाजूला जमिनीवर ठेवावेत.
प्रथम प्रकार : त्यानंतर दोन्ही पाय गुडग्यात दुमडून सायकल चालवल्याप्रमाणे प्रथम उजवा मग डावा पाय पॅडल फिरवल्याप्रमाणे प्रथम पुढच्या दिशेने पाच वेळा मग उलटय़ा दिशेने पाच वेळा फिरवावेत व ही कृती थकवा येईपर्यंत आपल्या क्षमतेनुसार करावी.
दुसरा प्रकार : दुसऱया प्रकारात आपण दोन्ही पाय उताणे झोपून गुडग्यात दुमडून घ्यावेत व नंतर एकत्र ठेवून दोन्ही पाय पुढच्या दिशेला गोलाकार सायकलचे पॅडल चालवल्याप्रमाणे फिरवावे. नंतर उलट दिशेन सायकलचे पॅडल चालवल्याप्रमाणे फिरवावे. अशा प्रकारे किमान पाच वेळा उलट-सुलट दोन्ही पाय फिरवून या आसनाची सांगता करावी.
महत्त्वाचे : पाय पुढे सोडताना शक्यतो गुडग्यात न दुमडता सरळ रेषेत ठेवावा. याने पोटावर ताण येऊन वजन तीव्र गतीने कमी व्हायला मदत होते.
श्री. कमलेश बांदेकर