प्रतिनिधी/ओटवणे :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत आहे. या रुग्णालयात रुग्णांच्या तातडीच्या
शस्त्रक्रियेसाठी ओ पाॅझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेने अवघ्या एका तासात १० रक्तदाते उपलब्ध करीत या संघटनेने पुन्हा एकदा हक्काच्या ‘ब्लड बँके’ची जबाबदारी पार पाडली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत गेले तीन महिने रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यात गेल्या दोन दिवसात ओ पाॅझिटिव्ह या रक्तगटाची मागणी वाढल्याने रुग्णांना रक्तासाठी ओरोस किंवा बांबोळीवर अवलंबून राहावे लागत होते. तसेच एलायझा टेस्ट सक्तीची केल्याने ईमर्जन्सीला रक्तदात्याचे रक्त घेतले जात नाही. अशा परिस्थितीत बुधवारी रूग्णालयातील गर्भवती व अतिदक्षता विभागातील रुग्णांना या रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे सावंतवाडी रक्तपेढीचे प्रशांत सातार्डेकर यानी रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना विनंती करताच त्यांनी रक्तदात्यांशी संपर्क तात्काळ संपर्क साधला.
त्यानंतर अवघ्या एका तासात वसंत सावंत, प्रकाश चौधरी, दिपक पिळणकर, इंद्रनिल अनघोळकर, गौरव सुकी, अक्षय मठकर, तन्मय कुडपे, भरत पगारे, किरण लतये, उमेश कानविंदे हे युवा रक्तदाता संघटनेचे हे युवक पुढे सरसावले. आणि युवकांनी सावंतवाडी रक्त पेढीत जाऊन रक्तदान केले. त्यामुळे या रक्तदात्यांसह
युवा रक्तदाता संघटनेचे रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.