सिव्हिल हॉस्पिटलनजीकची घटना
बेळगाव : हल्याळ, जि. कारवार येथील एका तरुणाने हॉटेल इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी बेळगाव येथे घडली आहे. सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील तम्मन्ना आर्केडमध्ये ही घटना घडली आहे. योगेश शानभाग (वय 28) असे त्या तरुणाचे नाव आहे. तम्मन्ना आर्केडमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ब्रु-59 या हॉटेल इमारतीच्या खिडकीतून उडी टाकून त्याने आपले जीवन संपविले आहे. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक रमेश आवजी, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हल्याळ येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते बेळगावात दाखल झाल्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार आपल्या मित्रांना भेटण्यासाठी योगेश बेळगावला आला होता. सायंकाळी मित्रांसमवेत हॉटेलला गेला होता. थोड्या वेळात खिडकीतून त्याने उडी घेतल्याचे सांगण्यात आले. योगेश ट्रेडिंग करीत होता. व्यवसायातील तोट्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय असून कुटुंबीय बेळगावात दाखल झाल्यानंतरच अधिक माहिती मिळणार आहे.