राज्य-राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी : दहशतवादी संघटनांचे समर्थन पडले महागात : कागवाड न्यायालयासमोर केले हजर
प्रतिनिधी /बेळगाव
शिरगुप्पी, ता. कागवाड येथील एका तरुणाची केंद्रीय व राज्य गुप्तचर यंत्रणांनी कसून चौकशी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजविघातक शक्तींचे समर्थन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली असून सायंकाळी त्याला अटकही झाली आहे.
केंद्रीय व राज्य गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱयांनी शिरगुप्पी येथील एका 22 वषीय युवकाला ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी त्याची कसून चौकशी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. चौकशीअंती त्याला रविवारी सायंकाळी कागवाड येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
शनिवारी रात्रीपासूनच या परिसरात गुप्तचर अधिकाऱयांचा वावर वाढला होता. चौकशी करून अधिकाऱयांनी संशयास्पद तरुणाला ताब्यात घेतले. यासह आणखी तीन तरुणांची चौकशी झाली आहे. यापैकी एकाला अटक करून स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. दहशतवादी संघटनांशी कसल्याही प्रकारचा संबंध आढळला नसला तरी सोशल मीडियावर समाजविघातकांचा पाठपुरावा करण्याचा प्रकार या तरुणाच्या अंगलट आला आहे.
बेंगळूर येथील सीसीबीच्या अधिकाऱयांनी गेल्या आठवडय़ात अल कायदाशी संबंधित संशयितांना अटक केली आहे. झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय असणाऱया हुसेनच्या अटकेनंतर कर्नाटकातील टेरर कनेक्शन उघडकीस आले होते. हिजबुल मुजाहिद्दीन व अल कायदा दहशतवादी संघटनांकडे कल असणाऱया तरुणांची धरपकड सुरूच आहे.
कर्नाटकाची राजधानी बेंगळूर हे अशा तरुणांसाठी सुरक्षित शहर बनले आहे. 25 जुलै रोजी अख्तर हुसेन (वय 24) याला अटक झाली. एनआयए व गुप्तचर विभागाने ही कारवाई केली होती. त्याच्यापाठोपाठ अब्दुल अलीम मंडल ऊर्फ जुबा (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील राहणारा असून तामिळनाडूतील सेलममधील कापड कारखान्यात काम करतो. आर्थिक अडचणीसाठी अल कायदा संघटनेत भरती होण्याची तयारी त्याने दर्शविली होती.
या दोघा जणांच्या अटकेनंतर केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागातील अधिकाऱयांनी सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवले होते. शिरगुप्पी येथील एका 22 वषीय तरुणाने समाजघातक संघटनांची पाठराखण केल्याचे उजेडात आले होते. त्यामुळे त्याने अशा संघटनात प्रवेश केला की काय? असा संशयही बळावला होता. गुप्तचर यंत्रणा व स्थानिक पोलिसांच्या चौकशीत याला पुष्टी मिळाली नाही. मात्र, दहशतवादी संघटनांच्या विचारांची पाठराखण करणे त्या तरुणाला महागात पडले आहे.
बेळगावात कारवाईची अफवा
रविवारी एनआयएच्या पथकाने महाराष्ट्र, कर्नाटकासह सहा राज्यात वेगवेगळय़ा ठिकाणी छापे टाकले आहेत. कोल्हापूर जिल्हय़ातही कारवाई करण्यात आली आहे. कारवार जिल्हय़ातील भटकळमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर बेळगाव येथे एनआयएने कारवाई केल्याची अफवा पसरली होती. अखेर शिरगुप्पी येथे संशयित तरुणाची चौकशी झाल्याचे सामोरे आले आहे.