मिरज-हुबळी, मिरज-कॅसलरॉक रेल्वे धावणार : रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली पॅसेंजर रेल्वे पुन्हा पूर्व पदावर येण्याची चिन्हे आहेत. येत्या 15 ऑगस्ट पासून मिरज -हुबळी व मिरज -कॅसलरॉक या दोन पॅसेंजर सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. परंतु जोवर रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा होत नाही तोवर प्रवाशांना पॅसेंजरची वाट पहावी लागणार आहे.
एप्रिल 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागले. तेव्हापासून आतापर्यंत मिरज-हुबळी या मार्गावरील पॅसेंजर सेवा बंद होती. पॅसेंजर बंद असल्यामुळे लोंढा, कॅसलरॉक, घटप्रभा, कुडची, गोकाक, रायबाग या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत होती. वारंवार मागणी करून देखील पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली नव्हती. मागील महिन्यात राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेत पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली होती.
हुबळी ते मिरज या रेल्वे मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरण केले जात असल्याने पॅसेंजर सेवा सुरू करण्यास विलंब होत असल्याचे कारण नैऋत्य रेल्वेकडून दिले जात होते. प्रवाशांच्या सोयीखातर किमान एकतरी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार मिरज-हुबळी, मिरज-कॅसलरॉक या दोन पॅसेंजरचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही पॅसेंजरला रेल्वे बोर्डाने हिरवा कंदिल दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु अद्याप नैऋत्य रेल्वे अथवा मध्य रेल्वेने या संदर्भात अधिकृत घोषणा केली नसल्यामुळे प्रवाशांना अजुन वाट पहावी लागणार आहे