प्रतिनिधी/ वडूज
खटाव तालुक्यातील वडूज-पुसेगांव रस्त्यावर सातेवाडी गावच्या हद्दीत कॉर्नरजवळ झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दरजाई येथील प्रवीण भिमराव वाघमारे (वय 29) व त्याचा पुणे येथील मित्र व नातेवाईक अविनाश अरुण कांबळे (वय 28) हे दोघेजण मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास दुचाकीवरुन वडूजहून दरजाईला निघाले होते. सातेवाडी कॉर्नरला गाडीच्या वेगावर नियंत्रण न झाल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱया नंबरी दगडाला जाऊन धडकली. व तेथून धडकून ते दोघे रस्ता वळण असणाऱया बोर्डावर आदळून खाली पडले. या अपघातात कांबळे हे जागीच ठार झाले आहेत. तर वाघमारे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
दरम्यान, मयत अविनाश कांबळे हा मुळचा कराड तालुक्यातील रहिवाशी असून तो व प्रवीण वाघमारे हे पुणे येथे वाहन चालक म्हणून काम करत असल्याचे समजते. ते दोघे उन्हाळी सुट्टीसाठी गावी आले होते. सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी गावी आलेल्या अविनाश कांबळे यांच्यावर काळाने घाला घातला.