पॅराग्लायडिंग करताना सुरक्षा बेल्ट उघडला, हिमाचल प्रदेशातील कुल्लूत जिल्हय़ातील दुर्घटना
तबरेज बागवान/ सातारा शहर
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिह्यातील डोभी परिसरात शनिवारी पॅराग्लायडिंग दरम्यान सिक्युरिटी बेल्ट अचानक उघडल्याने शिरवळ येथील 31 वर्षीय तरुण सुरज संजय शाह (मूळ रा. लोणंद) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सूरज शाह आणि पायलटला तत्काळ कुल्लू येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. मात्र, पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरजचा मृतदेह सोमवारी दुपारी शिरवळ येथे त्याच्या राहत्या गावी येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरज शाह आपल्या पाच ते सहा मित्रांसमवेत दि. 22 रोजी गेले होते. शनिवार दि. 24 रोजी कुल्लु जिल्हय़ातील डोभी या पॅराग्लायडिंग साईटवर पॅराग्लायडिंग करण्यासाठी पोहोचला. पॅराग्लायडिंग पायलट शालू सोबत त्याने उड्डाण घेतले. उड्डाणानंतर काही वेळातच पायलट आणि सुरज खाली कोसळले. या अपघातात सुरजचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पायलट शालू गंभीररित्या जखमी झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पायलट शालू यांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाण करताना सेफ्टी बेल्ट बांधलेले होते. व ते कसे वापरावे याबाबत निर्देश देण्यात आले होते. तरी उड्डाणादरम्यान सुरजचा हात वारंवार सेफ्टी बेल्टकडे जात होता. दरम्यान, सेफ्टी बेल्ट सैल झाल्याने उड्डाणावरील नियंत्रण संपले आणि पायलटसह दोघे खालील सफरचंदाच्या शेतात कोसळले.
सदर अपघाताची माहिती सूरजच्या कुटुंबियांना कळवताच शिरवळ परिसरात शोककळा पसरली. सुरज संजय शाह अत्यंत हुशार अन् ऍडव्हेंचरप्रेमी होता. याआधी त्याने हिमालयाच्या भागात ऍडव्हेंचर ट्रेक केले होते. कुल्लु जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले असून सोमवारी दुपारपर्यंत एअर ऍम्ब्युलन्सने पार्थिव पुणे विमानतळावर व तेथून ऍम्ब्युलन्सने शिरवळ येथे आणण्यात येणार आहे.
सूरजचे वडील संजय शाह येथे मूळचे लोणंद येथील. पण गेल्या 20 वर्षांपासून उद्योग व्यवसायानिमित्ताने ते औद्योगिक वसाहत असून म्हणून ओळख असलेल्या शिरवळ येथे वास्तव्यास आहेत. येथीलच एमआयडीसीमध्ये त्यांचे प्लास्टिक निर्मितीचा प्लॅन्ट आहे. सूरज हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि दोन विवाहित मुली आहेत. सूरज हा बी. ई. मेकॅनिक असून सध्या तो पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता.
पोलिसांचा तपास सुरु
या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304 ए अंतर्गत पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला जबाबदार कोण हे तपासानंतरच कळेल’, असे पोलीस अधिकारी गुरुदेव यांनी सांगितले.