प्रतिनिधी / पणजी
गुरुवारी विधानसभेत म्हादई मुद्दावर ठेवण्यात आलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत काळे कपडे घालून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक युवकांना सुरक्षारक्षकांनी बाहेरच अडविले. हे युवक रितसर पास घेऊन आले होते. परंतु विधानसभेच्या गॅलरीत जाऊन निषेध नोंदवतील म्हणून त्यांना आत जाऊ दिले नाही.
म्हादई मुद्यावर गुरुवारी चर्चा होणार असल्यामुळे प्रक्षक गॅलरीत पास घेण्यासाठी बुधवारी गर्दी झाली होती. अनेकांनी पास मिळविले होते. गुरुवारी संध्याकाळी या मुद्यावर चर्चेचा वेळ ठरला असला तरी सकाळीच ही मंडळी आली होती. त्यातील अनेकजण काळ्या वेषात आले होते. कीहीजणांनी काळी टीशर्ट घातली होती. तर काही जणांनी आतील काळी टीशर्ट दिसूनये म्हणून टीशर्टच्यावर वेगळ्या रंगाचा शर्ट परीधान केला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेरच रोखले.