पुणे / प्रतिनिधी :
मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेना आग्रही असते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निगडीत प्रश्नांसाठी युवा सेना लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 25 महाविद्यालयात युवा सेना कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सरदेसाई यांनी कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरदेसाई म्हणाले, युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीकडून पुणे विद्यापीठाच्या प्रश्नांकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहरातील 25 महाविद्यालयात नव्याने युनिट स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सिनेट सदस्य बाकेराव बस्ते यांच्याकडूनही विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्न मांडण्यात येतील.