वनडे क्रिकेट इतिहासात झिम्बाब्वेला कांगारुंविरुद्ध तिसऱयांदा यश
वृत्तसंस्था/ क्वीन्सलँड
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियावर झिम्बाब्वेचा 2-1 असा पराभव केला असला तरी या मालिकेतील झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर 3 गडय़ांनी थरारक विजय मिळविला. वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावरील हा तिसरा ऐतिहासिक विजय ठरला. झिम्बाब्वेने 2014 साली हरारे येथे पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याची झिम्बाब्वेची ही पहिलीच वेळ आहे.
या शेवटच्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार चेकाबेव्हाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. झिम्बाब्वेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 141 धावात आटोपला. त्यानंतर झिम्बाब्वेने 7 बाद 142 धावा जमवित हा सामना 3 गडय़ांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये डेव्हिड वॉर्नरने एकाकी लढत देत 94 तर मॅक्सवेलने 19 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे रेयान ब्युरेलने प्रभावी गोलंदाजी करताना 10 धावात 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावामध्ये केटानो आणि मेरुमनी या सलामीच्या जोडीने 38 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने केटानोला 19 धावांवर बाद केले. हॅझलवूडने त्यानंतर झिम्बाब्वेच्या वेस्ले मध्वेरेला 2 धावांवर तर सिन विल्यम्सला खाते उघडण्यापूर्वी पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. सिकंदर रझा 8 धावांवर बाद झाला. मेरुमनीने 35 धावा जमविल्या.
ग्रीनने त्याला बाद केले. झिम्बाब्वेची स्थिती यावेळी 5 बाद 77 अशी केविलवाणी होती. कर्णधार रेगिस चेकाबेव्हा आणि मुनयोंगा यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गडय़ासाठी 38 धावांची भर घातली. संघाची धावसंख्या 115 असताना झिम्बाब्वेची ही जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या ऍगेरने मुनयोंगाला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. यावेळी झिम्बाब्वेला विजयासाठी 17 धावांची जरुरी होती. कर्णधार चेकाबेव्हा आणि ब्युरेल या जोडीने आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. कर्णधार चेकाबेव्हाने नाबाद 37 तर ब्युरेलने 11 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशल स्टार्कने वन डे क्रिकेटमध्ये आपल्या बळींचे द्विशतक पूर्ण केले. स्टार्कने ब्युरेलला बाद करून आपला वनडे क्रिकेटमधील 200 बळी नोंदविला. ब्रॅड इव्हान्सने विजयी धाव घेतली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया सर्वबाद 141 (वॉर्नर 94, मॅक्सवेल 19, ब्युरेल 5-10), झिम्बाब्वे 7 बाद 142 (मेरुमनी 35, चेकाबेव्हा नाबाद 37, ब्युरेल 11, सिकंदर रझा 8, केटानो 19, हॅझलवूड 3-30).