गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा दावा : प्रभावशाली राजकारणी व अन्य नेत्याचा सहभाग
प्रतिनिधी /मडगाव
झुआरी ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा जमीन घोटाळा 50,000 कोटी रुपयांचा असून, तो राज्याच्या कर्जाच्या दुप्पट असल्याचा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केला आहे. एक प्रभावशाली राजकारणी आणि आणखी एक नेता या घोटाळ्याला मनापासून पाठिंबा देत असल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला. या मुद्यावर जे पक्ष निवडणुकीपूर्वी गोव्यासाठी बोलत होते त्यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
गोवा फॉरवर्डचे प्रमुख मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा करताना म्हणाले की, जमिनीविषयीचे फेरफार एका दिवसात करण्यात आले. यावरून कंपनीला मदत करण्याच्या बाबतीत राज्य सरकारची कामगिरी दिसून येते. सरदेसाई यांनी नगरनियोजन खात्याने जमिनीच्या रूपांतरणावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. कळंगूट-कंदोळी, पर्रा-नागोवा आणि मुरगाव ओडीपीच्या बाबतीत सक्रिय असलेले नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी या बेकायदेशीरपणे होणाऱया जमिनीच्या रूपांतरणावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले की, गुरुवारी झालेल्या टीसीपीच्या बैठकीत या जमिनीचा वापर रिअल इस्टेटला करू देण्याऐवजी सांकवाळ औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी केला जावा, अशी सर्वसाधारण भावना होती. फातोर्डाच्या आमदारांनी दावा केला आहे की, 60 च्या दशकात कंपनीला औद्योगिकीकरणाच्या उद्देशाने शेंगदाण्याच्या भावाने दिलेली जमीन आता व्यावसायिक कारणांसाठी वापरली जात आहे. ते म्हणाले की, 1200 फ्लॅट्ससह मेगा हाऊसिंग प्रकल्प येथे आकार घेत आहेत आणि कंपनीकडून जमीन तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये विकली जात आहे.
चौकशी आयोगाची मागणी
सरदेसाई यांनी जमिनीचे रूपांतरण आणि विक्रीप्रकरणी चौकशी आयोगाची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी औद्योगिकीकरणासाठी ही जमीन दिली होती. परंतु सध्याच्या सरकारने रिअल इस्टेटला चालना देण्याच्या उद्देशाने जमिनीचे रूपांतरण करण्यास परवानगी दिली आहे. गोवा सरकारने सदर जमीन परत घेऊन ती औद्योगिक कारणासाठी द्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री सरदेसाई यांनी केली आहे.