सूत्रधारासह 16जणांना अटक : सर्व संशयित बिगरगोमंतकीय,14 कॉम्पुटरसह 8 मोबाईल जप्त
प्रतिनिधी /पणजी
ओल्ड गोवा येथील कदंब पठारावरील सनशाईन स्कूलजवळ सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरचा सायबर क्राईम विभागाने पर्दाफाश केला असून मुख्य सूत्रधारासह 16 जणांना अटक केली आहे. सूत्रधारासह सर्वजण बिगरगोमंतकीय आहेत. यामध्ये आठ युतींचाही सहभाग आहे. संशयितांच्या विरोधात भादंसंच्या 419, 420 तसेच आयटी कायदा 66सी व 66डी कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद रमीझ एम. घानजी उर्फ रॉय फर्नांडिस (32, गुजरात) याने हे बनावट कॉल सेंटर सुरु केले होते.
अमेरिकन नागरिकांना बक्षीस काड&
ओल्ड गोव्यातील या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांना ऍमेझॉन कंपनीतर्फे 500 ते 1 हजार अमेरिकन डॉलर किंमतीचे बक्षीस कार्ड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. हे कार्ड मिळवायचे असल्यास ऍमेझॉनच्या खात्यात अमेरिकन डॉलर भरा. नंतर बक्षीस कार्ड मिळणार. नंतर कार्डद्वारे दुप्पट किमंतीची खरेदी करा, असे सांगण्यात येत होते.
ऍमेझॉनच्या खात्यात डॉलर भरण्याची सूचना
वास्तविक ज्या ऍमेझॉनच्या खात्यात अमेरिकन डॉलर भरण्यासाठी ग्राहकांना सांगण्यात येत होते ते बँक खाते अगोदरच संशयित हॅक करीत होते. त्यामुळे ग्राहकांनी भरलेले पैसे सरळ संशयितांना मिळत होते. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जात होती.
याबाबत सायबर गुन्हा विभागाच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करून सारा प्रकार उघडकीस आणला. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत कारवाई करून संशय़ितांना अटक करण्यात आली.
निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे, सर्वेश सावंत, महिला सहाय्यक उपनिरीक्षक शितल नाईक, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल सागर गवस, मयुर राणे, संयोग शेटय़े, विनय आमोणकर, विशाल शितोले, संदेश नाईक, इब्राहिम करोल, नीलेश नाईक, नाझीर सय्यद व हेमंत गावकर यांनी ही कारवाई केली आहे.