भाजप खासदाराचे पुत्र ः
उत्तरप्रदेशात चौथ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू आहे. सप प्रमुख अखिलेश यादव यांची भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक यांनी भेट घेतली आहे. जेथे माझा उपयोग होऊ शकेल किंवा कुणी मला बोलावत असेल तर मी तिथे जाईन असे मयंक यांनी बुधवारी या भेटीबद्दल बोलताना म्हटले आहे.
अखिलेश आणि माझी भेट ही एक शिष्टाचाराची भेट होती. अखिलेश यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता आणि त्यांनी तो दिला. भाजपचा कुठलाच नेता मला भेटलेला नाही, कदाचित त्यांच्याकडे वेळ नसावा असे उपरोधिक विधान मयंक जोशी यांनी केले आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याचे दुःख त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
2017 पासून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. 2019 मध्ये देखील प्रयत्न केला होता. यंदा देखील पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून धडपड केली होती. परंतु मी निवडणूक लढवावी असे पक्षाला वाटत नसल्याचे मयंक म्हणाले. मयंक जोशी यांनी लखनौ कँट मतदारसंघातील भाजप उमेदवारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने अशा व्यक्तीला उमेदवारी दिली आहे, जो या मतदारसंघातून जिंकू शकणार नाही असा दावा त्यांनी केला.
मयंक यांनी लखनौ कँट मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्याने ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचा कयास व्यक्त होत होता. परंतु तसे घडले नाही. सपने लखनौ कँटमधून राजू गांधी यांना तिकीट देत मयंक यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना विराम दिला होता. रीता बहुगुणा जोशी यांनी मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून संसद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने हा प्रस्ताव नाकारला होता.