प्रतिनिधी / कुर्डुवाडी
गेल्या अनेक दिवसांपासून कुर्डुवाडी शहराची कोरोनामुक्ती दिशेने वाटचाल सुरु होती. आज अखेर दि.११ जून रोजी कुर्डुवाडी शहर
कोरोनामुक्त झाले असून एकही नवा रुग्ण आजमितीस शहरात राहिलेला नाही. शहरातील सर्व कन्टेन्मेंट झोन आता संपुष्टात आले असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली. त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून कोरोनामुक्तीसाठी लढणाऱ्या सर्व प्रशासनाचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
कालपर्यंत शहरात केवळ २ बाधित रुग्ण अॅक्टीव होते.आज त्यांनाही डिस्चार्ज दिल्यामुळे अॅक्टीव रुग्णांची संख्या शून्यावर आली तसेच गेल्या १२ दिवसांपासून आजपर्यंत एकही बाधित रुग्ण शहरात आढळला नाही.
कुर्डुवाडी शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व ग्रामीण रुग्णालयाने रोज किमान १०० कोरोना तपासणी करुन बाधित रूग्णांचे निदान केल्यामुळे आज ५५९ बाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.
कुर्डुवाडी शहरात आजपर्यंत ११ झोन होते त्यापैकी एकही झोन सध्या अॅक्टीव राहिलेला नाही. एकूण ५४८२ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये आजपर्यंत ५९० बाधित रुग्ण असल्याचे समोर आले आहे त्यापैकी ५५९ रुग्ण उपचार घेऊन सुखरुप घरी परतले आहेत. तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
नगरपालिका प्रशासन, स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, सर्व डाॅक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस आणि प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष कोरोनासाठी काम करणाऱ्या सर्व विभाग व संघटनांचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे