ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा संकरावतार वेगाने फैलावल्यावर जगभरात चिंता वाढली होती. परंतु नव्याच्या तुलनेत जुन्या विषाणूने संक्रमित रुग्णांना अधिक प्रमाणात दाखल करण्याची वेळ आली असून याचबरोबर मृत्यूही अधिक झाले आहेत. इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ संस्थेच्या अध्ययनात हे दिसून आले आहे. नव्या स्ट्रेनसंबंधी गडबडून जाण्याची गरज नाही, हा जुन्या संकरावताराच्या तुलनेत अधिक फैलाव करणारा असला तरीही जीवघेणा नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
धोकादायक नाही
ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ संस्थेद्वारे 3600 रुग्णांवर हे अध्ययन करण्यात आले आहे. यात दोन्ही स्ट्रेनचे प्रत्येकी 1800 रुग्ण होते, परंतु यातील केवळ 42 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 26 रुग्ण जुन्या संकरावताराचे होते, तर 16 रुग्ण नव्या विषाणूचे हेते. यातून नव्या स्ट्रेनमुळे पीडित रुग्णांमध्ये गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट होते. तर जुन्या संकरावतारात हे प्रमाण अधिक आढळून आले आहे.
जुन्या विषाणूने गंभीर आजार
जुन्या स्ट्रेनच्या 26 रुग्णांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आणि नव्या स्ट्रेनच्या 16 रुग्णांपैकी 10 जणांचा मृत्यू ओढवला. नव्या स्ट्रेनच्या तुलनेत जुन्या स्ट्रेनने पीडित रुग्णांचे अधिक मृत्यू झाले. यातून नवा स्ट्रेन जीवघेणाही कमी असल्याचे स्पष्ट होते. जुन्या तुलनेत नवा स्ट्रेन अधिक संक्रामक असला तरीही तो अधिक धोकादायक तसेच जीवघेणा नसल्याचे या अध्ययनातून समोर आले आहे.
ब्रिटनमध्ये लसीकरण
ब्रिटनमध्ये फायजरनंतर ऑक्सफोर्डची लसही लोकांना देण्यात येणार आहे. सरकारने 10 कोटी डोसची ऑर्डर दिली असली तरीही उत्पादन त्या प्रमाणात झालेले नाही. डिसेंबरअखेरीस नवा स्ट्रेन वेगाने फैलावल्यावर लंडन समवेत अनेक शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती.