युवा समितीचा हेस्कॉमला इशारा : कानडीकरणाला केला विरोध
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमकडून देण्यात येणाऱया वीजबिलांचे कानडीकरण करण्यात आले आहे. या विरोधात बुधवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हेस्कॉमच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. वीजबिले पूर्वीप्रमाणे इंग्रजी व कन्नड भाषेत न मिळाल्यास बिले भरणार नाही, असा इशारा युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेल्या वीजबिलांमध्ये बदल करण्यात आला. मागील महिन्यापर्यंत इंग्रजी व कन्नड अशा दोन भाषेत असणारे वीजबिल या महिन्यात मात्र पूर्णपणे कन्नड भाषेत आल्याने ते वाचणे कठीण होत होते. कर्नाटकात मराठीसह अनेक भाषिक या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत बिल देणे आवश्यक आहे. सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक असल्यामुळे कन्नड सक्ती रद्द करून मराठी भाषेतसुद्धा वीजबिल द्यावे, अशी मागणी युवा समितीने केली.
हेस्कॉमचे मुख्य अभियंते पी. जी नागराज यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी कर्नाटकात असल्यामुळे कन्नड भाषेतून बिल देत असल्याचे सांगितले. यावर अध्यक्ष शुभम शेळके यांनी आक्षेप घेत अल्पसंख्याक आयोगाने दिलेला आदेश व बेंगळूर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत हेस्कॉमच्या अधिकाऱयांना दाखविली. त्यानंतर अधिकाऱयांची बोलती बंद झाली. आपण युवा समितीने केलेली मागणी हुबळी येथील मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, वासू सामजी, बाबू पावशे, संतोष कृष्णाचे, विनायक कावळे, सुधीर शिरोळे यांसह इतर उपस्थित होते.