ऑस्ट्रेलियात 300 हून अधिक आरोग्य कर्मचाऱयांना लागण : जगभरात 1 कोटी 59 लाख 69 हजार 465 रुग्ण
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1,59,69,465 जणांना झाली आहे. यातील 97 लाख 62 हजार 369 बाधितांना महामारीपासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 43 हजार 390 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. ऑस्ट्रेलियात 300 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱयांना लागण झाली आहे. हे सर्व कर्मचारी व्हिक्टोरिया प्रांतातील रुग्णालयात कार्यरत होते. व्हिक्टोरियाचे प्रीमियर डॅनियल एंड्रूज यांनी शनिवारी यासंबंधी माहिती दिली आहे. प्रांतात सुमारे 4 हजार रुग्ण असून यात 313 आरोग्य कर्मचाऱयांचा समावेश आहे.
औषधांच्या किमती घटणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱया केल्या आहेत. यात औषधांच्या किमती कमी करणे आणि उपचाराचा खर्च किफायतशीर करण्याशी संबंधित आदेश सामील आहे. या आदेशांमुळे अमेरिकेच्या अनेक प्रांतांना कॅनडामधून स्वस्त औषधे मागविता येणार आहेत. ट्रम्प यांच्या नव्या आदेशांमुळे इन्सुलिन सारखी औषधे रुग्णांना कमी किमतीत उपलब्ध होऊ लागतील. औषधांशी संबंधित हा नवा आदेश शनिवारपासून लागू होणार आहे. या आदेशांवर चर्चा करण्यासाठी ट्रम्प 28 जुलै रोजी औषध कंपन्यांच्या अधिकाऱयांसोबत बैठक घेणार आहेत.
अमेरिकेत संकट कायम
अमेरिकेत दिवसभरात 73 हजार 715 नवे कोरोनाबाधित सापडले असून 1,130 जणांचा बळी गेला आहे. तेथील न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा प्रांतात सर्वाधिक संकट आहे. तर न्यूजर्सीच्या लाँग समुद्रकिनाऱयावरील 23 सुरक्षारक्षकांना बाधा झाली आहे. आयलँडच्या आरोग्य विभागाचे संचालक डेनियला प्रुपिंस्की यांनी याची माहिती दिली आहे. मिसीसिपी प्रांताच्या गव्हर्नरांनी वाढती रुग्णसंख्या पाहता कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे.
द. कोरिया : रुग्ण वाढले
दक्षिण कोरियात मार्चनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. कोरिया सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (केसीडीसी) शनिवारी याची माहिती दिली आहे. दिवसभरात तेथे 86 नवे बाधित सापडले असून यातील 27 जणांना स्थानिक पातळीवर संसर्ग झाला आहे. विदेशातून पोहोचणाऱया लोकांमुळे रुग्णांची संख्या वाढू शकते. अन्य देशांमधून परतणाऱया सर्व लोकांची चाचणी केली जात असल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी म्हटले आहे.
103 वर्षीय वृद्ध संसर्गमुक्त
पाकिस्तानात एका 103 वर्षीय वृद्ध नागरिकाने महामारीवर मात केली आहे. अजीज अब्दुल अलीम असे या वृद्धाचे नाव असून तो चित्राला जिल्हय़ाचा रहिवासी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. अजीज मागील महिन्याच्या अखेरीस पॉझिटिव्ह आढळून आले होते. संसर्गमुक्त झाल्याने चालू आठवडय़ातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 71 हजार 887 बाधित सापडले असून 5,787 जण दगावले आहेत.
जगभरात विषाणूचा स्ट्रेन एकसारखाच
कोरोनाच्या जीन मॅपिंगचे निष्कर्ष : प्रभावी लस निर्मितीस मदत
भारत आणि जगभरात कोविड-19 फैलावणाऱया कोरोना विषाणूचा स्ट्रेन एकसारखाच आहे. स्ट्रेनमध्ये साधर्म्य असल्याने अधिक प्रभावी लस निर्माण करण्यास मदत होणार असल्याचे उद्गार सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबादचे संचालक राकेश मिश्रा यांनी काढले आहेत. कोरोना विषाणूच्या विस्तृत जीन मॅपिंगच्या निष्कर्षानुसार तो म्युटेट होण्याची शक्यता कमी असून तो अधिक धोकादायक स्वरुपही प्राप्त करणार नाही.
315 व्हायरल जीनोमचे अध्ययन
हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने 315 कोरोना विषाणूच्या जिनोम स्क्वेंसिंगचे अध्ययन केले आहे. तेथील संशोधकांनी देशभरातून नमुने प्राप्त केले आहेत. देशातील लोकसंख्येत आढळून आलेल्या 1700 कोरोना विषाणूच्या सीक्वेंसचे विश्लेषण करण्यात आले आहे. विषाणू एका वर्षात 26 वेळा म्युटेट होत आहे, म्हणजेच दर 15 दिवसांनी एकदा म्युटेट होत आहे. सद्यकाळात संसर्ग फैलावणारा विषाणू अधिक धोकादायक होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संचालक मिश्रा म्हणाले.
महत्त्वाची माहिती
विषाणूच्या म्युटेशनच्या अध्ययनाच्या निष्कर्षानुसार तो न्यूट्रल किंवा स्वतःला नुकसान पोहोचविणारा आहे. या पुढील काळातही नव्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेसिंग केले जाणार आहे. विषाणू कितपत संसर्ग फैलावतो हे जाणून घेण्यास या अध्ययनामुळे मदत होणार आहे. लसनिर्मिती आणि रुग्णांवर अधिक प्रभावी उपचाराकरता हे निष्कर्ष महत्त्वाचे ठरतील.
कॅटालोनियाला जाऊ नका
कॅटालोनिया भागात जाऊ नका असे आवाहन फ्रान्स सरकारने लोकांना केले आहे. स्पेनला लागून असलेल्या सीमेवर देखरेख वाढविली जात आहे. सीमेवरून बाधित देशात आल्यास संसर्ग वाढण्याचा धोका आहे. विशेषकरून देशाच्या उत्तर-पूर्व सीमेवर सरकारची नजर असल्याचे उद्गार पंतप्रधान ज्यां कास्ते यांनी काढले आहेत. देशाता मागील 15 दिवसांमध्ये 16 हजार 410 रुग्ण सापडले आहेत. यातील बहुतांश रुग्ण याच भागात आढळून आले होते. फ्रान्समध्ये काही दिवसांपूर्वी सर्व सार्वजनिक ठिकटाणी मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
विडोडोंचा अहवाल निगेटिव्ह
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. देवाच्या कृपेने अध्यक्ष तंदुरुस्त असल्याचे विधान त्यांचे सचिव हेरु बुडी हर्टोनो यांनी शनिवारी केले आहे. विडोडो यांनी सोलो शहराचे महापौर एचमंड पुर्नोमो यांची गुरुवारी भेट घेतली होती. एचमंड हे पुढील काळात कोरोनाबाधित आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विडोडो यांनी शुक्रवारी स्वतःची चाचणी करवून घेतली होती. विडोडो यांच्या सर्व कर्मचाऱयांचीही चाचणी करण्यात आली होती.
10 दिवस विलगीकरण
नॉर्वेने प्रवास निर्बंधांसंबंधी नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. नव्या नियमांनुसार स्पेनमधून येणाऱया लोकांसाठी 10 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य असणार आहे. परंतु स्वीडनमधून येणाऱया लोकांवर कुठलेच बंधन नसणार आहे. देशात आतापर्यंत 9 हजारांहून अधिक बाधित सापडले असून 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8674 बाधितांनी महामारीपासून मुक्ती मिळविली आहे. नॉर्वेने संसर्गाचा धोका पाहता सर्व विमानतळांवर प्रवाशांसाठी चाचणी अनिवार्य केली आहे.