वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
लायोनेल मेसीने ट्रेडमार्क फ्री किकवर गोल नोंदवत पूर्वार्धात अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली असली तरी उत्तरार्धात एदुआर्दो व्हर्गासने चिलीला बरोबरी साधून दिल्याने कोपा अमेरिका स्पर्धेतील हा सामना 1-1 असा अनिर्णीत राहिला.
याच महिन्याच्या सुरुवातीस या दोन संघांत विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सामन्यात गाठ पडली होती, त्यावेळी चिलीचा गोलरक्षक क्लॉडिओ ब्रॅव्होने ऍक्रोबॅटिक हालचाली करीत मेसीची फ्री किक थोपवली होती. तसेच त्याचा आणखी एक फटका गोलपोस्टच्या बारला लागल्याने वाया गेला होता. पण यावेळी 33 व्या मिनिटाला मेसीने गोलजाळय़ाच्या कोपऱयाच्या दिशेने शानदार फटका मारत अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली होती. 2015 व 2016 मधील कोपा अमेरिका फायनल्समध्ये चिलीने पेनल्टीवर अर्जेन्टिनावर मात केली होती. मात्र 90 मिनिटांच्या नियमित खेळात चिलीने आजवर या स्पर्धेत अर्जेन्टिनावर एकदाही विजय मिळविलेला नाही.
येथील सामन्यातही मेसीने आघाडी मिळवून दिल्यावर चिली संघाचे काम कठीण होऊन बसले होते. ऍलेक्सिस सांचेझ दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नसला तरी चिलीने संघर्ष करीत उत्तरार्धातील 13 व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. व्हीएआरच्या माध्यमातून त्यांना पेनल्टी मिळाली होती. आर्टुरो विडालने मारलेला जोरदार फटका एमिलियानो मार्टिनेझने स्पर्श करीत चेंडूला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बारला लागून रिबाऊंड झाल्यानंतर व्हर्गासने हेडरवर चेंडू जाळय़ात मारला. अर्जेन्टिनाचा गेल्या पाच सामन्यातील हा चौथा अनिर्णीत सामना होता.