जमावाचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; संशयिताचे घर जाळण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ कराड
आटके (ता. कराड) येथे गुरूवारी युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी युवकाचा रविवार उपचारादरम्यान मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. मारहाण करणारांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अन्य एकाला अटक करा, अशी मागणी करत जमाव आक्रमक झाला. आक्रमक जमावाने कराड तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका संतप्त जमावाने घेतल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान, आटके येथे संशयिताचे घर जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला आहे.
अजय विठ्ठल दुपटे (वय 30, रा. आटके, ता. कराड) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत मारहाण प्रकरणी नागेश विठ्ठल दुपटे याने कराड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून यापूर्वी सचिन लक्ष्मण दुपटे (रा. आटके) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोमवारी सचिन दुपटे याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील आटके येथील अजय दुपटे हा जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. सचिन दुपटे व अजय यांच्यात काही कारणावरून वाद होता. वर्षभरापूर्वी सचिनने कराड शहर पोलिसात अजय याच्याविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान, अजयला समजावून सांगा नाहीतर मी त्याचे हातपाय मोडीन, अशी धमकी सचिन वारंवार नागेशला देत होता. गुरूवारी, दिनांक 18 रोजी सकाळी अजय शेणोली येथे निघाला असताना सचिनने त्याला मारहाण केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागेश त्याठिकाणी गेला असता अजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. नागेशसह नातेवाईकांनी जखमी अजयला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा रविवारी मृत्यू झाला.
अजयचा मृत्यू झाल्याने त्याच्या संपर्कातील लोक आक्रमक झाले. संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून लगेच अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तणाव वाढला होता. रविवारी पोलिसांनी आक्रमक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमवारी सकाळी जमाव पुन्हा आक्रमक झाला. पुन्हा आटके ग्रामस्थांनी संशयित सचिन व अन्य साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत जमाव कराड तालुका पोलीस ठाण्यासमोर आला. जमावाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी अजयच्या नातेवाईकांसह लोकांची बाजू ऐकून घेत त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच त्यांचे जाबजबाब घेत सचिन व अन्य एकास ताब्यात घेतल्याचे सांगितले.
याप्रकरणी यापूर्वी दाखल असलेल्या गुह्यात कलम वाढवून खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही अधिकाऱयांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करत आहेत.
संशयिताचे घर जाळण्याचा प्रयत्न
संशयित सचिन याच्या घरावर काही अज्ञातांनी दुपारी अचानक हल्ला केला. त्याचे घर पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला मात्र तोपर्यंत घराशेजारील जनावरांचा गोठा जळाला होता. यामध्ये एक शेळी व अन्य दोन छोटी पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. हा प्रकार झाल्यावर परिसरात तणाव वाढला. पोलिसांनी घराच्या भोवती बंदोबस्त वाढवला होता. यासंदर्भात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अज्ञातांनी हल्ला केला असून नेमका हल्ला कोणी केला याचाही तपास सुरू आहे.