दोघेही मळगावचे : तब्बल 20 तासांनी मृतदेह सापडले
दोघेही वाढदिवस साजरा करून गेले होते धरणावर
वार्ताहर / आडेली:
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-जाधववाडी येथील मिलिंद मधुकर जाधव (27) व अमोल गौतम मळगावकर (27) या दोघा युवकांचा येथील धरणात बुडून मृत्यू झाला. मळगाव येथे आपला वाढदिवस साजरा करून ते आडेली-कामळेवीर येथील धरणात पोहोण्यासाठी आले होते. ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. मात्र, गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्या देघांचे मृतदेह सापडले. या संदर्भात मिलिंद याचा चुलत भाऊ राजन जाधव याने दिलेल्या खबरीनुसार वेंगुर्ले पोलिसांत बेपत्ताची नोंद झाली आहे.
मळगाव-जाधववाडी येथील मिलिंद मधुकर जाधव व अमोल गौतम मळगावकर हे एकाच वाडीतील व जवळचे मित्र होते. बुधवारी त्या दोघांचेही वाढदिवस होते. आपला वाढदिवस साजरा करून ते क्रिकेटही खेळले. त्यानंतर पाच वाजण्याच्या सुमारास ते बाहेर निघून गेले. ते रात्री दहा वाजेपर्यंत घरी न आल्याने घरातील व वाडीतील लोकांनी शोधाशोध केली. त्या वाडीसह ग्रामस्थांनी मळगावातही
शोध घेतला. तरी ते सापडले नव्हते. ते आडेली धरणावर पोहायला गेले असावेत, या अंदाजाने त्या भागातील दोघेजण सकाळी आठ वाजता आडेली-कामळेवीर धरण भागात आले. तेव्हा मिलिंद आणि गौतम यांच्याजवळ असलेली मोटार सायकल (एमएच-07-एएल-4561) ही धरणाच्या कठडय़ावर आढळली. पुढे आकेशियाच्या झाडांकडे त्यांची चप्पल, कपडे, मोबाईल, दोघांचे पैशाचे पाकीटही आढळले. त्यानंतर याबाबत मळगाव येथे माहिती दिली. त्यानुसार दोन्ही युवकांचे नातेवाईक व ग्रामस्थ धरणस्थळी आले. शोधमोहीम हाती घेण्यात आली.
सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आडेली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, हेड कॉन्स्टेबल डी. बी. पालकर, सचिन सावंत, प्रमोद काळसेकर, सूरज रेडकर, नितीन चोडणकर, सूरज पाटील, ओरोस स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सूर्याजी नाईक आदी पोलीस पथक, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप घटनास्थळी दाखल झाले. आडेली सरपंच समिधा कुडाळकर, आरोग्य सेवक शेखर कांबळी, पोलीस पाटील संजना होडावडेकर, मळगाव पोलीस पाटील रोशनी जाधव, कामळेवीर शिवसेनचे नितीन मांजरेकर, गंगाधर गोवेकर, शाखाप्रमुख बंडय़ा मांजरेकर, मळगाव शाखाप्रमुख महेश शिरोडकर, मळगाव सरपंच कृष्णा ऊर्फ बाबू गावडे, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, माजी सदस्य राजू परब, मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, माजी सरपंच नीलेश कुडव, दांडेली उपसरपंच योगेश नाईक यांच्यासह मळगाव येथील 150 तर आडेली येथील 150 ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. आडेली धरणात गेल्या काही वर्षात मगरींचा मुक्त संचार असल्याने धरणात उतरण्यासाठी कोणीही धजत नव्हते. तसेच धरणात गाळही मोठय़ा प्रमाणावर आहे.
पोलीस निरीक्षक मोरे यांनी वेंगुर्ले व मालवण येथील रेस्क्यू पथकाशी संपर्क साधला. तसेच मालवण येथील स्कुबा ड्रायव्हरशी वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांनीही संपर्क साधला. नगराध्यक्ष गिरप यांनी वेंगुर्ल्यातील मच्छीमारांशी संपर्क साधत फायबर बोट मागवून घेतली. त्याचबरोबर मालवणचे स्कुबा डायव्हिंग पथकही दाखल झाले.
दुपारी सापडले मृतदेह
फायबर बोट व स्कुबा ड्रायव्हर दाखल झाल्यानंतर ते शोध घेण्याच्या तयारीत असतानाच दुपारी अडीचच्या सुमारास अमोल मळगावकर याचा मृतदेह तरंगत वर आला. तर मिलिंद जाधव याचा मृतदेह दुपारी तीनच्या सुमारास वर आला. दोन्ही मृतदेह पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ते बुडाल्यापासून तब्बल 20 तासांनी मृतदेह सापडले. मृतदेह पंचनामा करून विच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
मिलिंद एकुलता
मिलिंद हा एकुलता एक मुलगा होता. तो कॉन्ट्रक्टर अमित वेंगुर्लेकर यांच्याकडे गेली पाच वर्षे पेंटिंगसह विविध कामे करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, काका, काकी असा परिवार आहे. तर अमोल मळगावकर हा अरुण शर्मा यांच्या फॅब्रिकेशन सेंटरमध्ये काम तसेच मोलमजुरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आहेत.
चार वर्षांपूर्वीही बुडाला होता युवक
चार वर्षापूर्वी याच धरणात पोहण्यास गेलेला युवक बुडाला होता. तोदेखील गाळात रुतून राहिल्याने त्याचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हर आणावे लागले होते. त्यांच्यामुळेच त्याचा मृतदेह सापडला होता.