येत्या सोमवारपर्यंत नियमांची कडक अंमलबजावणी- केजरीवाल यांची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता या भागात प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. आता दिल्लीत 3 मे म्हणजे येत्या सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. ‘लॉकडाऊन’च्या सर्व निर्बंधांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच रविवारी यासंदर्भातील माहिती दिली.
दिल्लीत कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव सुरूच आहे. लॉकडाऊनपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 36-37 टक्क्मयांवर पोहोचला होता. मात्र कडक नियमांच्या अंमलबजावणीमुळे मागील एक-दोन दिवसांमध्ये संसर्गाचा वेग काहीसा कमी झाला असून, सध्या तो 30 टक्क्मयांपर्यंत पोहोचला आहे’, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.
ऑक्सिजन पुरवठा हळूहळू पूर्वपदावर
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कडक निर्बंधांची मुदत वाढवितानाच दिल्लीतील ऑक्सिजन तुटवडय़ाचाही मुद्दा अधोरेखित केला. गेल्या दोन दिवसांपूर्वी मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत असला तरी आता योग्य पुरवठय़ामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील इस्पितळांसाठी जवळपास 700 टन ऑक्सिजनची आवश्यकता असून सध्याच्या घडीला 330 ते 335 टन ऑक्सिजन दिल्लीपर्यंत आला असल्याची माहिती देत, केंद्राकडूनही ऑक्सिजन तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार दिवसात दिल्लीतील इस्पितळांमध्ये प्राणवायूच्या पुरवठय़ाअभावी 50 हून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले होते.
दिल्लीत शनिवारी दिवसभरात 357 मृत्यू
दिल्लीत वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये 93 हजार 080 इतके सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचा आकडा दर दिवशी वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात कोरोनामुळे 357 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. आतापर्यंत राज्यात 13 हजार 898 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत.