सावंतवाडी तहसीलच्या लिपिकाला पकडले
ऐपतीच्या दाखल्यासाठी मागितले चार हजार
लाचखोरीची आठ दिवसातील दुसरी घटना
महिलेच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई
प्रतिनिधी / सावंतवाडी :
येथील तहसीलदार कार्यालयातील लिपीक पुरुषोत्तम कृष्णा वारंग (52) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ पकडले. बँक कर्जासाठी लागणारा ऐपतीचा दाखला देण्यासाठी वारंग याने लाच मागितल्याची तक्रार एका महिलेने केली होती. वारंग याला लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करून मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महसूल विभागातील जिल्हय़ातील गेल्या आठवडाभरातील ही दुसरी कारवाई आहे.
पुरुषोत्तम वारंग हा सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे ऐपतीचा दाखला तयार करण्याचे काम असते. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून छाननी करून आल्यानंतर ऐपतीचा दाखला तयार करून तो तहसीलदारांच्या सहीने अर्जदाराला दिला जातो.
हा दाखला मिळावा, यासाठी तक्रारदार महिला सोमवारी वारंग याच्याकडे आली. वारंग याने तिच्याकडे दाखला तयार करून देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधित महिलेने यासंदर्भात तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तहसीलदार कार्यालयात सापळा रचून वारंग याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर कार्यालयात पंचनामा करण्यात आला. या कारवाई मोहिमेत उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्यासह निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक फाले, हवालदार सुभाष गवस, कांचन प्रभू, परब, पोतनीस यांनी सहभाग घेतला.
सदरची लाचेची रक्कम वारंग यांनी कुणाच्या सांगण्यावरून मागितली, याची चौकशी करण्यात येणार आहे. वारंग याने सध्यातरी स्वत:साठी पैसे मागितल्याचे सांगून यात अन्य कुणाचा सहभाग नसल्याचे सांगितल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
शासकीय काम करण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी पैशाची मागणी करत असेल तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक कांबळे यांनी केले आहे.
नव्या वर्षातील तिसरी कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारीपासून केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी 31 मार्चला देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रामसेवक दीपक केतकर याला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुल योजनेचा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी आठ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते. तर 16 फेब्रुवारीला कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे याला खरेदी खताची सातबारावर नोंद करण्यासाठी चार हजाराची लाच घेताना अटक केली होती. तर सोमवारी तिसरी कारवाई सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात करण्यात आली.