वृत्तसंस्था/ कोलकाता
बायोबबलमध्ये असतानाही अनेक संघांना कोरोनाचा फटका बसल्याने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने आय लीग स्पर्धा सहा आठवडय़ासाठी स्थगित केल्याचे सोमवारी जाहीर केले.
एकूण 45 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर एआयएफएफने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. ‘सर्व सहभागी संघांच्या विनंतीवरून एआयएफएफ क्रीडा मेडिकल समितीचे सदस्य डॉ. हर्ष महाजन यांच्या शिफारसीनंतर आय लीग स्पर्धा किमान सहा आठवडे लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असल्याचे एआयएफएफने निवेदनाद्वारे सांगितले. चार आठवडय़ानंतर एआयएफएफचे उपाध्यक्ष सुब्रता दत्ता रिव्हय़ू बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. बायोबबलचे प्रोटोकॉल्स 7 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहेत. बुधवारी सर्व सहभागी संघांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेतली जाणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.
संघांचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य आहे, त्याच ठिकाणी बाधित खेळाडू व पदाधिकाऱयांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. देशात तसेच कोलकाता व उपनगरातही कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने तेथे सामने खेळविणे अशक्य बनले असून स्पर्धाही अडचणीत आली आहे.