ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आज कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. आर्यन बरोबर त्याचे मित्र अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांनाही गुरूवारीच जामीन मंजुर करण्यात आला आहे. मात्र, मुनमुन धामेचा नियमांच्या कचाटय़ात सापडली असल्याने सुटकेसाठी तिच्या वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात धावाधाव सुरू आहे.
आर्यन खानच्या जामिनासाठी शाहरुख खानची मैत्रीण अभिनेत्री जुही चावला जामीन राहिली. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यन खानची जामिनावर सुटका झाली, त्यानंतर तो आज घरीही परतला. मात्र, मुनमुन धामेचा मध्यप्रदेशची रहिवासी असल्यामुळे तिला जामीनदार शोधण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तिच्या वकिलांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धामेचाला तात्पुरत्या रोख रकमेवर जामिनावर सोडावं, अशी विनंती तिच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.