कसोटी मालिकेत 2-0 फरकाने एकतर्फी बाजी, एम्बुल्डेनियाची अष्टपैलू खेळी निष्फळ
गॅले / वृत्तसंस्था
इंग्लंडने यजमान श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकत 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा लंकन भूमीतील हा सलग 6 वा कसोटी विजय असून 2018 मधील मालिकेत 3 तर त्यापूर्वी 2012 मधील मालिकेत शेवटची कसोटी त्यांनी जिंकली होती. या 6 पैकी 5 विजयात इंग्लंडचे नेतृत्व रुटकडे राहिले आहे.
दुसऱया डावात विजयासाठी 164 धावांचे आव्हान असताना एकवेळ इंग्लंडने 89 धावात 4 फलंदाज गमावले होते. पण, नंतर जोस बटलर (46) व डॉम सिबली (56) यांनी पाचव्या गडय़ासाठी 75 धावांची अभेद्य भागीदारी साकारत संघाला विजय संपादन करुन दिला. सिबलीला यापूर्वी या मालिकेतील 3 डावात जेमतेम 6 धावांवर समाधान मानावे लागले होते. पण, येथे चौथ्या डावात त्याने तडफदार अर्धशतक झळकावत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
वास्तविक, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्यावेळी इंग्लंडचा पहिला डावच सुरु होता. त्यांनी 9 बाद 339 धावांवरुन डावाला सुरुवात केली आणि आणखी 5 धावांची भर घातली आणि सर्वबाद 344 धावा जमवल्यानंतर पहिल्या डावाअखेर लंकेकडे 37 धावांची आघाडी राहिली. त्यानंतर लंकेचा दुसरा डाव मात्र अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत राहिला. पहिल्या सत्रातच लंकेने 66 धावांमध्ये चक्क 6 फलंदाज गमावले.
यापूर्वी पहिल्या डावात इंग्लंडच्या फिरकीपटूंना एकही बळी मिळाला नव्हता. पण, दुसऱया डावात डॉम बेस व जॅक लिच या सॉमरसेटच्या जोडीने प्रत्येकी 4 फलंदाजांना बाद करत लंकन डावाला जणू सुरुंग लावला. तसे पाहता, लंकेला मंद खेळपट्टीवर खेळण्याचा उत्तम अनुभव आहे. मात्र, सोमवारी या लढतीतील चौथ्या दिवशी ते अजिबात दडपण हाताळू शकले नाहीत.
सामन्यात 10 बळी घेणाऱया लसिथ एम्बुल्डेनियाने 42 चेंडूत 40 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. मात्र, यातून पराभव लांबवण्यावाचून काही साध्य झाले नाही. एम्बुल्डेनियाने सुरंगा लकमलसमवेत 48 धावांची भागीदारी साकारल्याने लंकेला शंभरी पार करता आली. नंतर इंग्लिश कर्णधार जो रुट स्वतः गोलंदाजीला आला आणि आपल्या दुसऱया षटकात सलग 2 चेंडूंवर शेवटचे 2 फलंदाज बाद करत लंकेच्या शेपटीची वळवळ संपुष्टात आणली.
चौथ्या डावात विजयासाठी 164 धावांचे आव्हान असताना इंग्लंडने सहज फटकेबाजी सुरु केली आणि चौकारही सहजपणे येत राहिले. पुढे रुट आपल्या पसंतीचा स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर लंकेसाठी आशाअपेक्षा निर्माण झाल्या. इंग्लंडला यावेळी विजयासाठी आणखी 80 धावांची गरज होती. पण, लंकन फिरकीपटू 164 धावांचे संरक्षण करु शकले नाहीत.
या विजयासह रुटने लंकन भूमीत कसोटी जिंकण्याच्या निकषावर विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. रुटने 4 डावात 426 धावांचे योगदान दिले. तो सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला. इंग्लंडचा संघ आता लंकेतून थेट चेन्नईला रवाना होणार असून येथे भारताविरुद्ध ते 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद 381. इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 344. लंका दुसरा डाव ः सर्वबाद 126 (लसिथ एम्बुल्डेनिया 42 चेंडूत 40, डॉम बेस 4-49, जॅक लिच 4-59, जो रुट 0 धावेत 2 बळी). इंग्लंड दुसरा डाव ः 43.3 षटकात 4 बाद 164 (डॉम सिबली 144 चेंडूत नाबाद 56, जोस बटलर 48 चेंडूत नाबाद 46. लसिथ एम्बुल्डेनिया 3-73, रमेश मेंडिस 1-10).