भारतीय महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटी
ब्रिस्टॉल / वृत्तसंस्था
यजमान इंग्लिश महिला संघाने भारतीय महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चहापानाअखेर 2 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी कर्णधार हिदर नाईट 100 चेंडूत 7 चौकारांसह 47 तर नताली स्कीव्हर 24 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिले. भारतीय संघातर्फे पूजा वस्त्रकार व स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ब्रिस्टॉलवर सुरु असलेल्या या लढतीत इंग्लिश महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 55 षटकात 2 बाद 162 धावांची सावध मजल गाठली. लॉरेन विनफिल्ड-हिल व टॅमी बीमाऊंट यांनी प्रारंभी 20.3 षटकात 69 धावांची सलामी दिली. लॉरेनने 63 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 35 तर बीमाऊंटने 144 चेंडूत 6 चौकारांसह 66 धावांचे योगदान दिले.
पूजा वस्त्रकारने (1-37) लॉरेनला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले आणि यष्टीरक्षक भाटियाने एकहाती अप्रतिम झेल टिपत लॉरेनची खेळी संपुष्टात आणली. नंतर स्नेह राणाने बीमाऊंटला बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी नोंदवला. सिली मिडऑनवरील शफालीने पुढे झेपावत तिचा उत्तम झेल टिपला.
संक्षिप्त धावफलक (चहापानाअखेर)
इंग्लंड पहिला डाव ः 55 षटकात 2 बाद 162 (बीमाऊंट 144 चेंडूत 6 चौकारांसह 66, हिदर नाईट 100 चेंडूत नाबाद 47, लॉरेन हिल 35, स्कीव्हर नाबाद 11. पूजा वस्त्रकार, स्नेह राणा प्रत्येकी 1 बळी).