नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने शुक्रवारी उशिरा ही घोषणा केली. सॅव्हिओ मेदिरा यांना अंतरिम तांत्रिक संचालकपदी नेमले गेले. सॅव्हिओ येथे इसाक दोरु यांची जागा घेतील.
क्रोएशियन वर्ल्डकपर स्टीमॅक व इसाक दोरु यांच्याशी यापूर्वी साधारणपणे एकाच वेळी करार केले गेले होते. पण, आता फक्त स्टीमॅक यांना मुदतवाढ मिळाली तर दोरु यांना यातून वगळले गेले आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने स्टीमॅक यांच्याशी आता सप्टेंबर 2021 पर्यंत करार असेल, असे जाहीर केले. ब्राझीलमध्ये संपन्न झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाला प्रशिक्षण देणाऱया स्टीमॅक यांच्याशी भारतीय व्यवस्थापनाचा यापूर्वीचा करार 15 मे पर्यंत होता.
विश्वचषक स्पर्धेतील स्थाननिश्चितीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकले गेलेल्या भारतीय संघाची आता दि. 3 जून रोजी आशियाई चॅम्पियन्स कतारविरुद्ध, 7 जून रोजी बांगलादेशविरुद्ध तर दि. 15 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. चीनमधील 2023 आशियाई चषक स्पर्धेतील पात्रतेसाठी हे सामने महत्त्वाचे असतील. आशियाई चषक क्वॉलिफायर्स लढती सप्टेंबरमध्ये होणार आहेत.