प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील लालनगरमधील रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होऊन हाणामारीचा प्रकार घडला. यावेळी संतप्त ग्राहकाने दुकानातील टेबल, खिडक्मया आदीसह साहित्याची मोडतोड केली. यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावभाग पोलिसांनी हस्तक्षेप केला व गर्दी हटविली या प्रकरणी गावभाग पोलिसात बेबी विश्?वनाथ आवळे व नफिसा झाकीरहुसेन शेख यांच्या परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास घडला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे एक महिन्यापासून सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रेशन धान्य दुकानात धान्य न मिळालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही 8 रुपये व 12 रुपये प्रमाणे गहू व तांदूळ देण्यास सुरुवात झाली आहे. तर येथील लालनगर परिसरात विनोद आवळे यांचे रेशनधान्य दुकान आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी नफिसा शेख या धान्य आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आवळे यांनी माझ्याकडे फक्त तांदूळ आले आहे. आज किंवा उद्या गहू येणार असल्याने सोमवारपासून सर्वांना धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. या कारणावरुन आवळे व शेख यांच्यात वादावादी झाली. त्याचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले. त्यातून शेख यांचा मुलगा अजीज व आवळे आणि त्यांची आई बेबी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली.
यावेळी शेख याच्यासह त्याठिकाणी असलेल्या काहीजणांनी आवळे यांच्या दुकानातील टेबल, खिडकीसह अन्य साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. याबाबतची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगविले. तसेच विनोद आवळे व अजीज शेख यांना ताब्यात घेतले. बेबी विश्वनाथ आवळे यांच्या तक्रारीनुसार नफिसा झाकीरहुसेन शेख व अजीज झाकीरहुसेन शेख (दोघे रा. वेताळ पेठ) या दोघांवर तर नफिसा शेख यांच्या परस्परविरोधी फिर्यादी नुसार बेबी विश्वनाथ आवळे व विनोद विश्वनाथ आवळे (रा. लालनगर) या दोघावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.